महापालिकेचे स्थानिक संस्था कर विभागाचे अधीक्षक राजेंद्र पाटील यांची अनेक तक्रारीनंतर बदली करण्यात आली आहे. त्यांना भांडारपाल पदावर पाठविण्यात आले असले तरी स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) उत्पन्नातील घटसंदर्भात त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने संशयात भरच पडली आहे.
पालिकेच्या उत्पन्नात स्थानिक संस्था कराचा मोठा वाटा असताना मागील दोन वर्षांच्या तुलनेत मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षांत वसुलीमध्ये मोठी वाढ अपेक्षित असताना उत्पन्नात घट दिसून आली. त्यामुळे विभाग अधीक्षक राजेंद्र पाटील यांना जबाबदार धरण्यात येऊन कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यनंतर त्यांच्यावर पुढील कोणतीच कारवाई न झाल्याने उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांच्याकडून पाटील यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा होती. आयुक्त संजय कापडणीस यांनी पाटील विरोधातील तक्रारीची दखल घेत त्यांची बदली भांडारपाल विभागात केली आहे. तथापि, कराचे उत्पन्न कमी म्हणून त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.
महापालिकेच्या २०१०-११ या आर्थिक वर्षांत स्थानिक संस्था कराचे उत्पन्न ४५ कोटी २६ लाख होते. २०११-१२ या आर्थिक वर्षांत त्यात तब्बल १३ कोटी रुपयांची भर पडून ते ५८ कोटी ११ लाखांवर गेले असताना २०१२-१३ या आर्थिक वर्षांत मात्र कराच्या वसुलीत सुमारे आठ कोटी रुपयांची घट झाल्याची माहिती मिळाली आहे.

Story img Loader