औरंगाबाद रस्त्यावरील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील तीन रिक्षांसह तब्बल १२ वाहने बुधवारी मध्यरात्री जाळण्यात आली. ही वसाहत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोरच, चौकात आहे. मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा तोफखाना पोलीस गुरुवारी पंचनामा करत असतानाच, शेजारील इमारतीत चोरटय़ांनी भरदुपारी धाडसी चोरी करत नायब तहसीलदाराच्या घरातून ५ तोळे सोन्याचे दागिने पळवून नेले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
डीएसपी चौकात, डाव्या बाजूला सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतींच्या दहा-बारा इमारती आहेत. त्यातील कावेरी या इमारतीच्या तळमजल्यावर वाहनतळावर उभी केलेली वाहने पेटवून दिली गेली आहेत. या ठिकाणी अनेक वाहने उभी होती, परंतु नागरिकांनी स्वत:ची काही वाहने वाचवली. यासंदर्भात श्रीमती रजनी दत्तात्रेय ताठे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्या दोन रिक्षांसह एक दुचाकी पेटवली गेली. रफिक पठाण यांचीही तीन वाहने, संतोष पवार, नलिनी चंद्रकांत पवार, रमेश दत्तू पाटील, महादेव काशिनाथ डोंगरे, आण्णासाहेब भिंगारदिवे यांचीही वाहने पेटवण्यात आली. हे सर्व सरकारी कर्मचारी आहेत.
मध्यरात्री अचानक फटाक्यांसारखा आवाज व धूर येऊ लागल्याने कावेरी इमारतीमधील कर्मचाऱ्यांना संशय आला, तेव्हा तळमजल्यावर वाहने पेटलेली दिसली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाहने पेटवताना ज्वालाग्राही पदार्थाचा वापर करण्यात आला. सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांना तेथे पेट्रोलची रिकामी बाटली आढळली. अधिक तपास सहायक निरीक्षक गोगावले, उपनिरीक्षक लष्कर, दत्तात्रेय हिंगडे, एस. के. पवार, डहाके, वाघ, शेरकर करत आहेत.
पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे
वाहने जाळण्याच्या घटनेचा तोफखाना पोलीस आज दुपारी पंचनामा करत असतानाच त्याच वसहातीमधील लगतच्या इमारतीमधील नायब तहसीलदार मच्छिंद्र मुरलीधर काशिद यांचे बंद घर दोघा चोरटय़ांनी फोडले व ५ तोळे सोन्याचे दागिने पळवले. या चोरटय़ांना विरोध करणाऱ्या याच इमारतीमधील रहिवासी मनीषा भिसे यांच्या गळ्यातील मंगळसूत्रही हिसकावून, चोरटय़ांनी त्यांना घरात बांधून पळ काढला. भिसे यांच्या आरडाओरडय़ामुळे पंचनामा करणाऱ्या पोलिसांना चोरीची माहिती मिळाली. दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे पोलिसांच्या अब्रूचे पुरते धिंडवडे निघाले.

Story img Loader