गरीब रुग्णांवर खर्चिक उपचार व मोफत शस्त्रक्रिया व्हावी, यासाठी राज्य शासनाने अमलात आणलेली ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जीवघेणी ठरली आहे. पुरवलेल्या औषधांचे बिल थकल्याने पुरवठादाराने औषध तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य देणे बंद केल्याने रुग्ण आठ दिवसांपासून औषधाविना आहेत, तर नवीन येणाऱ्या रुग्णांना १५ दिवसानंतरच्या तारखा दिल्या जात आहेत.
या योजनेत लाभार्थी रुग्णाचा दावा मंजूर झाल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येते. या शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य मेडिकल स्टुडंट्स कन्झुमर को-ऑपरेटिव्ह सोसायटीमार्फत पुरवले जाते. या सोसायटीने आतापर्यंत कोटय़वधी रुपयांचे साहित्य व औषधे मेडिकल व सुपर स्पेशालिटीला पुरवली आहेत. या सोसायटीला नुकतेच मेडिकलच्या वतीने २० लाख रुपये दिल्याने औषध पुरवठा सुरू केला आहे, मात्र सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा दावा मंजूर होऊनही निधी दिला नसल्याने जोपर्यंत लाखो रुपयांचे बिल मिळत नाही तोपर्यंत औषध पुरवठा करणे शक्य नसल्याचे सोसायटीचे म्हणणे आहे. त्यामुळे पुरवठादार कंपनीने औषधे देणे बंद केले आहे. परिणामी, आठ दिवसांपासून उपचार मिळत नसल्याने रुग्णांची फरफट सुरू आहे. खरे तर रुग्णावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुटीच्या वेळी मंजूर झालेल्या दाव्याची रक्कम विमा कंपनीमार्फत मेडिकल, सुपरच्या खात्यात वळती व्हायला हवी, मात्र हे दावा विमा कंपनीने क्षुल्लक कारणांसाठी अडवून धरले आहेत. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सचिव यांनी मुंबईत नुकतीच मेयो व मेडिकलच्या अधिष्ठात्यांची बैठक घेतली, परंतु सुपरमधील जीवनदायीचा तिढा अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा