प्रश्नपत्रिका स्वीकारून परीक्षा केंद्रावरून पर्यवेक्षकच गायब झाल्याची घटना बारामतीमधील महाविद्यालयामध्ये बुधवारी घडली आहे. बारामतीमधील सोमेश्वर कला महाविद्यालयामध्ये ही घटना घडली आहे. पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबरच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. बारामती येथील सोमेश्वर महाविद्यालयामध्ये एम.ए. च्या इतिहास या विषयाच्या परीक्षेचे केंद्र होते. परीक्षेपूर्वी पर्यवेक्षकाने परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका स्वीकारल्या आणि त्या तशाच ठेवून ते परीक्षा केंद्रावरून चक्क गायब झाले. प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठय़ाचे सील काढून त्या वितरित करण्यात आल्यानंतर ज्या कागदपत्रांवर त्यांनी स्वाक्षरी करणे अपेक्षित होते. त्यावर परीक्षेच्या वेळेआधीच स्वाक्षरी करून पर्यवेक्षकांनी परीक्षा केंद्र सोडले. त्याचवेळी विद्यापीठाच्या परीक्षा तपासणी पथकाने परीक्षा केंद्राला भेट दिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. तपासणी पथकाने परीक्षा केंद्राबाबत विद्यापीठाकडे तक्रार केली असल्याचे समजते. याबाबत सोमेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्याना विचारले असता अशा प्रकारची घटना घडली असून या प्रकाराची चौकशी करून त्याबाबत कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.
प्रश्नपत्रिका स्वीकारून परीक्षा केंद्रावरून पर्यवेक्षक गायब
प्रश्नपत्रिका स्वीकारून परीक्षा केंद्रावरून पर्यवेक्षकच गायब झाल्याची घटना बारामतीमधील महाविद्यालयामध्ये बुधवारी घडली आहे. बारामतीमधील सोमेश्वर कला महाविद्यालयामध्ये ही घटना घडली आहे. पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबरच्या परीक्षा सध्या सुरू आहेत.
First published on: 24-11-2012 at 03:18 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supervisor disappear from exam center after getting the question paper