जिल्हा पुरवठा अधिकारी भिकाजी घुगे यांच्या अनागोंदी कारभारावर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी कडक ताशेरे ओढले. हिंगोलीत बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री वर्षां गायकवाड यांच्यासमोर घुगेंना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. घुगे यांच्यावरील तक्रारींचा पाढाच या वेळी वाचण्यात आला.
घुगे यांच्या कार्यकाळात किती रास्तभाव दुकानदारांना नोटिसा दिल्या, आतापर्यंत किती दुकानदारांवर कारवाई झाली याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना या वेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास केल्या. दांडेगावकर यांनी घुगे यांच्या अनागोंदी कारभाराविषयी माहिती देताच पालकमंत्र्यांनी घुगे यांना बोलावून घेत दांडेगावकर यांच्यासमोर धारेवर धरले. जिल्ह्य़ातील रास्तभाव दुकानदार व किरकोळ विक्रे त्यांवर सतत जाणीवपूर्वक कारवाया सुरू आहेत. अनामत रक्कम जप्त करणे, परवाना निलंबित करणे, विशेष म्हणजे सर्व कारवाया छोटय़ाच दुकानदारांवर नेमाने सुरू असल्याचा आरोप करून हे प्रकार नंतर मध्यस्थी करून तडजोडीतून मिटविले जात आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कारवाईचा निव्वळ फार्स निर्माण केला जातो, असे दांडेगावकर यांनी सांगून घुगे यांना चांगलेच धारेवर धरले. यापुढे हा प्रकार घडता कामा नये, असा सज्जड दम भरताना अन्यत्र बदली करून घ्या, अन्यथा आम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल, असा इशाराही दांडेगावकर यांनी घुगे यांना दिला.
शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत दांडेगावकर यांनी पुरवठा अधिकाऱ्यांवर ओढलेले ताशेरे पालकमंत्री वर्षां गायकवाड यांनी शांतपणे ऐकून घेत त्यावर जिल्हा प्रशासनास तत्काळ वरील आदेश दिला. या प्रकरणी अहवाल देण्यास त्यांनी बजावले. यापुढे कार्यपद्धतीत सुधारणा करा, अशा सूचनाही मंत्री गायकवाड यांनी दिल्या. या सर्व घडामोडींमुळे लवकरच घुगे यांची उचलबांगडी होणार याची चर्चा आहे.    

Story img Loader