जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शारदा जारवाल यांनी विजय मिळविला. त्यांना ३६ मते, तर शिवसेनेच्या नंदा ठोंबरे यांना २२ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ८ सदस्यांनी काँग्रेसबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षपद मनसेला मिळते का पाहा, तसे प्रयत्न करा, असे काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, आगामी निवडणुकांमधील तडजोडी लक्षात घेता आघाडीसमवेत राहण्याचा मनसेने निर्णय घेतला. सकाळी तसे संदेश मिळाल्यानंतर काँग्रेसला मतदान केल्याचे सदस्यांनी सांगितले.
जि. प. त काँग्रेसचे १५, राष्ट्रवादीचे १०, अपक्ष आमदार प्रशांत बंब समर्थक २, १ अपक्ष व ८ मनसेचे सदस्य आहेत. ही आघाडी अध्यक्ष निवडणुकीतही कायम असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. मतदानादरम्यान भिकाबाई तडवी या एकमेव सदस्य गैरहजर, तर प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी ९ पंचायत समिती सभापतींपैकी ४ सदस्यांची गैरहजेरी होती. सभापतींना मतदानाचा अधिकार नसतो. मात्र, त्यांना सभागृहात उपस्थित राहता येते. अध्यक्षपद मागास प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने काँग्रेसच्या या प्रवर्गातील एकमेव सदस्या शारदा जारवाल यांचे नाव निश्चित करण्यात आले. आघाडीचे संख्याबळ लक्षात घेता त्याच निवडून येतील, असे मानले जात होते. दुपारी २ वाजून २० मिनिटांनी मतदान प्रक्रिया सुरू झाली. हात उंचावून मतदान घेण्यात आले.
दरम्यान, अध्यक्षपदाची निवडणूक पूर्ण झाली असली तरी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार अध्यक्ष जारवाल यांना पदभार देता येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी स्पष्ट केले. मतदानावेळी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार, एम. एम. शेख, कल्याण काळे व सुभाष झांबड, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे आदींची उपस्थिती होती. मनसेच्या सदस्यांनी अध्यक्षपद मिळावे यासाठी बरेच प्रयत्न केले. ते न मिळाल्याने काही सदस्य हिरमुसले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी होऊ, असा विश्वास होता. न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून ही निवडणूक झाली. त्यामुळे त्या विषयी जो निर्णय होईल, तो मान्य असेल. येत्या सव्वा वर्षांत अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करू, असे जारवाल यांनी सांगितले. निधोना (तालुका फुलंब्री) हे जारवाल यांचे मूळ गाव आहे.

Story img Loader