काहीजणांचा जन्मच शापित असतो. कोणतीही चूक नसताना एक आजार घेऊन जन्मणाऱ्या अजाण बालकांना कोठे माहीत असते, त्यांच्यापुढे काय वाढून ठेवले आहे? आजार एचआयव्ही असेल तर? अशा मुलांसाठी मायेची ऊब देणारं उस्मानाबाद जिल्ह्य़ातील एक नावं म्हणजे शहाजी चव्हाण. गतिमंद, एचआयव्ही, कर्णबधीर आणि मूकबधीर अशा मुलांना सांभाळताना शहाजी चव्हाण यांची दररोज तारेवरची कसरत असते. आजारपण नेहमीचेच, पण दररोज कोणाला तरी रुग्णालयात दाखल करावचं लागत. कारण ४३ एचआयव्ही बाधित मुलांचा शहाजी चव्हाण आपुलकीने सांभाळ करतात. कळंबच्या सहारा एचआयव्ही बाधित मुलांचे बालगृह त्यांच्या कामामुळे चर्चेत आले आहे.
एका पेट्रोलपंपावर एक मुलगी कोणी तरी टाकून गेले. या मुलीला घेऊन पोलीस तब्बल २१ दिवस फिरत होते. शेवटी तिला चव्हाण यांनी जवळ केले. त्या मुलीला ना बोलता, ना चालता येत होते. प्रकृती एकदम तोळामासा, तिची टकळी लागली की, काहीच कळत नसे. अशा मुलीला सांभाळताना चव्हाण व त्यांचे सहकारी जी मेहनत घेतात ती शब्दातीत आहे.
शहाजी खरं तर रांगडा गडी. भूम, परंडा, कळंब भागातील भाषेतसुद्धा तो रांगडेपणा जाणवतो. कशाला उगीचच, न्हाई आम्ही करू की, काय बी काळजी करू नका, असे शब्द या भागात प्रचलित. शहाजी चव्हाणही याच भाषेत बोलतात. त्यामुळे त्यांचा कनवाळूपणा शहरी माणसाला सहजासहजी लक्षात येत नाही. सहारा बालकाश्रमावर गेल्यावर मुले जेव्हा घट्ट मिठी मारतात, तेव्हा त्यांच मातृहृदय समजून येतं.
केवळ एचआयव्हीच नाही, तर मतिमंद आणि अनाथ मुलांच्या समस्या तर वेगळय़ाच असतात. आपण किती खातो, हे त्यांना समजत नाही. त्यामुळे त्यांना ‘शी-सू’ कोठे करावी हेही कळत नाही. सारखे मुलांचे कपडे बदलणे हा एक उद्योगच असतो. एवढे कपडे आणायचे कोठून, असाही प्रश्न असतो. दानशूर व्यक्तींकडून जुने किंवा नवे कपडे मिळविण्यासाठी शहाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वेगळेच प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे प्रत्येक मुलाचा आहार किती असावा, कसा असावा, याचे वेळापत्रक ठरवावे लागते. जन्मदात्यांनी सोडून दिलेल्या अशा ३७ मुलींचा सांभाळ शहाजी चव्हाण करतात. हे सगळे काम त्यांच्या आतून आलेले आहे. आई-वडील मजुरी करणारे. तसे शहाजीचे शिक्षणही बेताचेच. पण मायेचा आणि प्रेमाचा ओलावा एवढा की त्यांनी अनेक मुलांना आपलसं केलं आहे.
या बालकाश्रमाला आणि मतिमंद मुलांच्या निवासी विद्यालयाला सरकारकडून अनुदान आहे. मात्र, ते पुरत नाही. एचआयव्ही बाधित असणाऱ्या मुलांसाठी औषधे मिळणेही कधीकधी अवघड होऊन बसते. अशा वेळी गावातल्या औषधी विक्रेत्यांच्या संघटनेकडून काही दानशूर व्यक्तींकडून निधी गोळा करायचा आणि जमेल तेवढे काम सकारात्मक पद्धतीने पुढे न्यायचे, ही त्यांची सवय. त्यांनी उभारलेले काम लक्षात घेऊन मदतीचा ओघही वाढू लागला आहे. या मुलांना आता काही वस्तू करायला, शिक्षकांनी शिकविले आहे. दिवाळी आणि गणेशोत्सव देखिल अनेक जण या मुलांबरोबर साजरे करीत आहेत. एखादे मुल आजारी पडले तर त्यांना तातडीने उपचार मिळावे, यासाठी पूर्वी त्यांना बरेच कष्ट करावे लागले. आजारी पडलेल्या मुलाला दुचाकीवरून अंबाजोगाई येथील दवाखान्यात त्यांना न्यावे लागे. हा कष्टाचा प्रवास त्यांनी सलग ८ वर्षे केला.
अलीकडेच उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने त्यांना रुग्णवाहिका दिली आहे. शहरातील संवेदनशील नागरिक आता शहाजीच्या बाजूने उभे आहेत. हे काम पुढे नेण्यास लागणारी संवेदनशिलता चव्हाण यांच्या अंगी असल्याने त्यांना मदतही मिळत आहे. त्यांच्या कामामुळे जिल्ह्य़ात ते सतत चर्चेत असतात.