नियतीपुढे अशरण वृत्तीने झुंज देत छोटय़ा-मोठय़ा संकटात निराश होणाऱ्या अनेकांसाठी कळंब येथील संत ज्ञानेश्वर मूकबधिर, तसेच सहारा एचआयव्ही बालगृहातील अनाथ मुलांनी नवा आदर्श समोर ठेवला. एचआयव्ही बाधित हातांनी साकारलेल्या बाप्पांच्या मूर्तीना त्यामुळेच कळंबवासीयांनी सर्वाधिक पसंती दिली.
नियतीने क्रूर चेष्टा केलेली असताना तिला शरण न जाता नियतीवर सकारात्मक विचाराने मात करीत सहारा एचआयव्ही बालगृहातील अनाथ चिमुकले नवी वाट चाचपडत आहेत. कोणताही सण, उत्सव, समारंभ असो अगदी सर्वसामान्य मुलांप्रमाणेच त्याचा आनंद ते लुटत आहेत. केवळ आनंद घेऊन न थांबता इतरांच्या आयुष्यात तो कसा नेता येईल, याचा विचारही वयाने लहान असलेले हे पोक्त चिमुकले अगदी सहज करतात. रक्षाबंधन, दीपावली अथवा गणेशोत्सव असो, या कालावधीत मूकबधिर आणि एचआयव्ही बाधित चिमुकल्यांनी साकारलेल्या वस्तूंना कळंबवासीयांनी मनात जागा करून दिली आहे. दीपावलीतील आकाश कंदील असोत, की बहीण-भावाच्या रेशमी धाग्याचा बंध, या चिमुकल्यांची कलाकुसर मनाला मोहवून टाकणारी आहे. गणेशोत्सवासाठी मूकबधिर विद्यालयातील सहा, तसेच एचआयव्ही बाधित चार चिमुकल्यांनी २५० गणेशमूर्ती साकारल्या होत्या. इको-फ्रेंडली असलेल्या या गणेशमूर्ती बाजारात जाण्यापूर्वीच संपल्या. या अनाथ चिमुकल्यांच्या कल्पनाविश्वातील गणपतीबाप्पांना आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी कळंबवासीय आतूर झाले होते. त्यामुळेच गणपतीबाप्पांच्या मूर्तीना बाजारात नेऊन विक्री करण्याची वेळ या चिमुकल्यांवर आली नाही. गणेशोत्सवाच्या आनंदाबरोबरच महिनाभरापासून मन लावून तयार केलेल्या बाप्पांच्या मूर्तीतून मिळालेल्या सुमारे २५ हजार रुपये उत्पन्नाकडे पाहताना या चिमुकल्यांच्या डोळ्यात गणपती बाप्पांच्या डोळ्याइतकीच चमक दिसून येत आहे. या मुलांनी आत्मनिर्भर व्हावे, आरोग्याबरोबर समाजातील अडीअडचणींचा सामना करण्याची जिद्द त्यांच्या अंगी यावी, यासाठीच हे प्रयत्न असल्याचे बालगृहाचे प्रमुख शहाजी चव्हाण सांगतात.

Story img Loader