क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा..निकालाकडे डोळे लावून बसलेले समर्थक.. प्रदीर्घ काळ चाललेली मतमोजणी प्रक्रिया.. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे गंगापूर रस्त्यावरील कोलमडलेली वाहतूक व्यवस्था.. कडेकोट पोलीस बंदोबस्त.. कधी प्रगती तर कधी समाजविकास पॅनलच्या नांवाने घोषणाबाजी..एखाद्या उमेदवाराच्या विजयाची चाहूल लागताच फटाक्यांची होणारी क्षणभंगूर आतिषबाजी..
सहकारी साखर कारखाना अथवा महापालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत दिसणारे हे दृश्य सोमवारी मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या मतमोजणीप्रसंगी अनुभवयास मिळाले. राज्यातील महत्वपूर्ण शिक्षणसंस्था म्हणून गणल्या जाणाऱ्या ‘ मविप्र’ संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा फड परस्परविरोधी चिखलफेकीमुळे आधीच रंगला होता. मतदानावेळी त्याची पुनरावृत्ती होऊन ही शैक्षणिक संस्थेची निवडणूक आहे की साखर कारखान्याची, असा प्रश्न या क्षेत्रातील जाणकारांना पडला होता.
राज्यातील व्दितीय क्रमांकाच्या शैक्षणिक संस्थेवर ताबा मिळविण्यासाठी विरोधकांनी तर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कंबर कसलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून ते निकाल लागेपर्यंत विविध कारणांनी चर्चेत राहिली. कार्यकारी मंडळ व सदस्य अशा १९ पदांसाठी झालेल्या निवडणुकीत जवळपास ९३ टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी गंगापूर रस्त्यावरील दादासाहेब थोरात सभागृहात मतमोजणीला कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरूवात झाली. या पाश्र्वभूमीवर, केटीएचएम महाविद्यालयासमोरील उड्डाण पुलाशेजारील रस्ता बॅरीकेट्स टाकून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
१९ जागांसाठी ७१ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत ‘प्रगती’ आणि ‘समाज विकास पॅनल’मध्ये होती. प्रगती पॅनलचे नेतृत्व नीलिमा पवार यांच्याकडे तर समाजविकास पॅनलचे नेतृत्व खा. प्रतापदादा सोनवणे, माणिकराव बोरस्ते, अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले. दोन्ही पॅनलचे समर्थक भल्या सकाळपासून मतमोजणी केंद्राबाहेर जमण्यास सुरूवात झाली. दुपापर्यंत त्यांच्या वाहनांची संख्या इतकी वाढली की, पोलीस वसाहतीपासून ते डोंगरे वसतिगृह, पंडित कॉलनी असा सर्व परिसर समर्थकांच्या वाहनांनी व्यापून टाकला. निवडणूक मंडळाचे सचिव रमेश तासकर आणि सदस्य अ‍ॅड. बाकेराव बस्ते, अ‍ॅड. भास्करराव चौरे व अ‍ॅड. शिवाजी खालकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीचे काम सुरू झाले.
 सायंकाळी पाच वाजेपर्यंत अधिकृतपणे कोणताही निकाल जाहीर झाला नसला तरी समाज विकास पॅनलच्या समर्थकांकडून अध्यक्षपदी खा. प्रतापदादा सोनवणे व सभापतीपदी अ‍ॅड. नितीन ठाकरे यांचा विजय झाल्याचा दावा केला जात होता. तशीच स्थिती प्रगती पॅनलच्या समर्थकांचीही होती. उपसभापतीपदी या पॅनलचे नानाजी दळवी आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले. सर्वात लक्षवेधी निवडणूक सरचिटणीसपदाची होती. कारण, मविप्र संस्थेत अध्यक्षांना जेवढे अधिकार नसतील, तेवढे अधिकार या पदाला आहेत. प्रगती पॅनलच्यावतीने नीलिमा पवार तर समाजविकास पॅनलचे माणिकराव बोरस्ते यांच्यात ही लढत होती.  सायंकाळपर्यंत दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार टक्कर सुरू असल्याचे दोन्ही पॅनलच्या समर्थकांकडून सांगण्यात येत होते. संपूर्ण मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अधिकृत निकाल जाहीर केला जाण्याची चिन्हे असल्याने दरम्यानच्या काळात या परिसरात दावे व प्रतिदाव्यांना उधाण आल्याचे पहावयास मिळाले. याची परिणती घोषणाबाजीत झाली. इतकेच नव्हे तर,   काही उत्साही मंडळींनी निकाल जाहीर होण्यापूर्वी फटाके फोडून   विजयोत्सव साजरा केला. अधिकृत निकाल जाहीर होण्याची घटीका जसजशी समीप येऊ लागली, तसतशी समर्थकांच्या उत्साहात भर पडली. सायंकाळी गंगापूर रस्त्यावर इतकी गर्दी जमली की, या मार्गावरील दोन्ही बाजुंची वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनाही गर्दीवर नियंत्रण मिळविणे अवघड ठरले. महापालिका, जिल्हा बँक अथवा सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीवेळी असे प्रकार काही नवीन नाहीत. परंतु, शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीतही तो कित्ता गिरविला गेल्याने आणि त्यात दोन्ही पॅनलच्या समर्थकांचा समावेश असल्याने संबंधितांना शिक्षण संस्थेचे काम करावयाचे आहे की राजकारण,    असा  प्रश्न या क्षेत्रातील जाणकारांसह या भागातून मार्गस्थ होणाऱ्यांना पडला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा