बुलढाण्यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर काळी शाई ओतून निषेध नोंदविण्याचा प्रकार घडल्यानंतर शुक्रवारी कोल्हापुरात मुश्रीफ समर्थक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर दुधाचा अभिषेक घालून बालंट पुसण्याचा प्रयत्न केला. कोल्हापुरात असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी मुश्रीफांचा दुग्धाभिषेक नव्हता, तर कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असे सांगितले. तर मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांकडून घडलेल्या दुग्धाभिषेकाची कबुली देऊन पुरोगामी महाराष्ट्रात अभिषेक घालण्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचे नमूद करून जनतेची माफी मागितली.     
बुलढाणा येथे एका कार्यक्रमामध्ये पालकमंत्री तथा कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरअपंग सेलचा जिल्हाध्यक्ष डोंगरदिवे याने काळी शाई ओतली होती. पालकमंत्री मुश्रीफ हे निर्णय घेण्यात अकार्यक्षम असल्याचा आरोप करीत त्याने हे कृत्य केले होते. या प्रकारामुळे मुश्रीफ यांची प्रतिमा डागाळली असल्याचा समज करून कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल डोंगरदिवेच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केले होते. तर मुश्रीफ राहात असलेल्या कागल तालुक्यात शुक्रवारी बंद पाळण्यात येऊन अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आज सकाळी मुश्रीफांचे येथील रेल्वे स्थानकामध्ये आगमन झाल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते त्यांना भेटले. त्यावर बुलढाणा येथे नेमके काय झाले आहे हे सांगण्यासाठी मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शासकीय विश्रामगृहात येण्यास सांगितले. तेथे मुश्रीफ एका खुर्चीवर येऊन बसले असताना कार्यकर्त्यांनी त्यांच्या डोक्यावर तांब्या, घागर, बादली, कॅन यामधून शेकडो लीटर दुधाचा अभिषेक घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुश्रीफही चक्रावून गेले.     
मंत्र्यांना अभिषेक घालण्याच्या प्रकाराची उलटसुलट चर्चा सुरू झाली. नेमके आजच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव करवीरनगरीत आले होते. त्यांना दुधाच्या अभिषेकाच्या प्रकाराबद्दल विचारणा केली. त्यावर जाधव म्हणाले, बुलढाणा येथे शाई ओतण्याच्या प्रकारावर कार्यकर्त्यांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. तो अभिषेक नव्हता. ज्या कार्यकर्त्यांने शाई ओतली त्याला पदावरून कमी केले आहे. तर मुश्रीफ यांनी मात्र कार्यकर्त्यांनी अभिषेक घातल्याचे मान्य केले. ते म्हणाले, विश्रामगृहात जमलेल्या कार्यकर्त्यांना माथेफिरूच्या कृत्यामुळे हळवे होऊ नका हे सांगण्यासाठी बोलावले होते. पण त्यांनी दूध ओतून अभिषेक घातला. हा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला शोभादायक नाही. याबद्दल मी जनतेची माफी मागतो.
राज्यकर्त्यांची दिवाळखोरी- खासदार शेट्टी
मुश्रीफांवरील शाई ओतणे व दुधाचा अभिषेक घालणे हा प्रकार दांबिकपणाचा असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली. मुश्रीफांच्या अंगावर शाई ओतणारा हा पक्षाचा जिल्हाध्यक्ष होता. त्याने पक्षाच्याच जिल्हाध्यक्षाचा अवमान केला असला तरी त्याची या कृत्यापर्यंत मजल का गेली हे शोधले पाहिजे. या घटनेनंतर मुश्रीफ यांनी आपली तुलना महात्मा गांधीजींशी करीत शाई ओतणाऱ्यांना माफ केल्याचे म्हटले आहे. गांधीजींचे आचरण कुठे आणि मुश्रीफांचे कुठे, असा प्रश्न उपस्थित करून शेट्टी यांनी दुधाचा अभिषेक घालणारे दीडशहाणे आणि घालून घेणारे तीनशहाणे असे म्हणत अभिषेकाचा प्रकार हा सवंग लोकप्रियतेचा असल्याची टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा