एक मुलगी शिकली की ती संपूर्ण घराला शिक्षित करते. पण, खरोखरच एक मुलगी जेव्हा शिकते तेव्हा ती आपल्या घराबरोबरच इतरही चार घरांतील मुलींना शिक्षित करते. किमानपक्षी आपल्याला समजलेल्या गोष्टीबद्दल त्यांना सजग तरी करते. आणि याच प्रयत्नांमधून बचतगटांसारख्या योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या आहेत. मात्र, यातून आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होऊ पाहणाऱ्या महिलांना त्याच्यापुढे आणखी एक पाऊल टाकत दुप्पट पैसा मिळवून देणाऱ्या अत्याधुनिक व्यवसायाचे ज्ञान देण्याचा वसा पूर्णिमा शिरीषकर यांनी घेतला आहे. ‘ऑनलाइन शेअर ट्रेडिंग’सारख्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपली कारकीर्द घडवायची इथपर्यंतच मर्यादित न राहता जास्तीत जास्त महिलांना याचे ज्ञान दिले तर घर आणि मुले सांभाळून चांगले पैसे मिळवून देणाऱ्या व्यवसायाचा पर्याय त्यांना मिळेल, या उद्देशाने पूर्णिमा शिरीषकरांची धडपड सुरू आहे.
वास्तविक बारावीनंतर मी कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. पण, हे शिक्षण सुरू असतानाच माझा विवाह झाला. त्यानंतर मुलीचा जन्म झाला. या सगळ्यात माझे शिक्षण अर्धवटच राहिले. मुलीच्या जन्मानंतर पुन्हा शिक्षणाचा विचार केला पण, रोजच्या रोज महाविद्यालयात हजेरी लावणे आणि छोटय़ा मुलीचा सांभाळ करणे अवघड होऊन बसले होते. पण, मनात शिक्षणाची जिद्द होती. आपण स्वत: घरासाठी आर्थिक जबाबदारी उचलावी, ही प्रबळ इच्छा होती. या इच्छेपोटी एमएलएम मार्केटिंगसारखे वेगवेगळे पर्याय चोखाळून पाहिले. पण, असे व्यवसाय हे दीर्घकाळासाठी नाहीत हे लवकरच लक्षात आले, असे पूर्णिमा यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांच्या भावाने त्यांना ‘ऑनलाइन ट्रेडिंग’ची माहिती दिली. मुळात, ही संकल्पना समजून घेणे आवश्यक होते त्यामुळे पेपर वाचायला सुरूवात केली. याविषयावरच्या कार्यशाळांमधून प्रशिक्षण घेतले आणि स्वत:ची छोटीशी गुंतवणूक करून सुरुवातही केली. पण, व्याख्यानातून मिळणारे शिक्षण आणि प्रत्यक्षातला अनुभव यात फार फरक असतो. त्यामुळे पहिल्या अनुभवात नुकसानच पदरात पडले होते, त्या सांगतात. मॉलमध्ये फिरताना जास्तीत जास्त पैसे खर्च करणाऱ्या महिला प्रामुख्याने गुजराती असतात. या निरीक्षणानंतर त्याच का, आम्ही का नाही?, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मग यातल्या बऱ्याचजणींचे नवरे ट्रेडिंगच्या व्यवसायात असल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा हे प्रकरण खोलात जाऊन शिकण्याची जिद्द त्यांच्या मनात निर्माण झाली.
‘बॉर्न टू विन’ नावाच्या संस्थेतून त्यांनी प्रशिक्षणाला सुरुवात केली. मात्र, हे शिकत असतानाच ‘शेअर बाजारात मंदी आली तरीही नफा मिळाला पाहिजे’ हा विषय त्यांनी प्रकल्प म्हणून निवडला आणि यात ५० हजाराचा नफा कमवण्याचे साध्य डोळ्यासमोर ठेवले. यासाठी मी ज्या पध्दतीने नियोजन केले ते फार यशस्वी ठरले. माझा प्रकल्पाचा अनुभव मी इतर विद्यार्थ्यांना सांगितला तेव्हा तुमची पध्दत विलक्षण आहे. ती तुम्ही आम्हाला शिकवाल का, असे इतरांनी विचारले आणि माझा हुरूप वाढला. मी शेअर ट्रेडिंगचे सामान्य ज्ञान देण्यास सुरुवात के ली. तेही अनोख्या पध्दतीने. ‘शेअर मार्केटिंग एंट्री, एक्झिट आणि प्रॉफिट’ असा साधा विषय मी घेतला. शेअर मार्के टिंगमध्ये उतरत असताना आपला प्रवेश कसा असावा, आपण त्यातून बाहेर कसे पडायचे आणि बाहेर पडताना नफा किती आणि कसा असावा हे सूत्र घेऊन मी व्याख्यानांचे आयोजन केले. पहिल्या व्याख्यानाला पाचजणी होत्या, त्याच पुढे माझ्या ग्राहक बनल्या. त्यानंतर दहाजणी आल्या. त्याही ग्राहक बनल्या. हा आकडा पुढे पुढे वाढत गेला. आता हा व्यवसाय मला जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवायचा आहे, असे त्यांनी सांगितले.
‘मी रोज गर्दीतून प्रवास करणाऱ्या, घरी परतून पुन्हा मुले, स्वयंपाक यात बुडून गेलेल्या महिलांना पाहते तेव्हा ‘ऑनलाइन ट्रेडिंग’सारख्या घरबसल्या कमाईची संधी देणारा व्यवसाय त्यांच्यासाठी किती उपयुक्त ठरू शकतो’, ही जाणीव होते. म्हणूनच, ‘सावित्रीबाई महिला विकास मंडळ’ या संस्थेची निर्मिती मी केली आणि आता त्याअंतर्गत जास्तीत जास्त महिलांना या व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांना त्यात कार्यरत करण्यावर माझा भर आहे. मी माझ्या याच व्यवसायाच्या कमाईतून लॅपटॉप घेतला आणि हा व्यवसाय वाढवला. पण, माझ्याक डे येणाऱ्या प्रत्येक महिलेकडे तिच्या कमाईतून आलेला लॅपटॉप असावा आणि त्याआधारे त्यांनी आपला ‘ऑनलाईन ट्रेडिंग’चा व्यवसाय वृध्दिंगत करावा हे माझे मोठे ध्येय असून त्यादृष्टीने आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, धुळे-नागपूरसारख्या लांब लांब ठिकाणांहून येणाऱ्या महिलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एक तास प्रशिक्षण क से देता येईल, यावरही त्या संशोधन करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा