परभणी फेस्टीव्हलचे उद्घाटन उद्या (मंगळवारी) दुपारी ४ वाजता बी. रघुनाथ सभागृहात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्याच दिवशी रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाने फेस्टीव्हलमधील कार्यक्रमांना प्रारंभ होत आहे. फेस्टीव्हलमध्ये अनेक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
पालकमंत्री प्रकाश सोळंके, राज्यमंत्री फौजिया खान, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, खासदार गणेश दुधगावकर यांच्यासह जिल्ह्य़ातील सर्व आमदार तसेच सर्व राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष या वेळी उपस्थित राहणार आहेत. बुधवारी (दि. १७) सायंकाळी ७ वाजता अपना हॉटेलच्या बाजूला सेंट्रल नाका येथे मुशायऱ्याचे आयोजन केले आहे. मुशायऱ्यासाठी गुलजार दहलवी (दिल्ली), मुनवर राणा (कोलकाता), राहत इंदोरी (इंदोर), माजी देवबंदी (देवबंद), जोहर कानपुरी, राही बसतवी आदी उपस्थित राहणार आहेत. युवती, महिला तसेच ज्येष्ठांसाठी स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. यात या तिन्ही गटांसाठी निबंधस्पर्धा असून युवतींसाठी व्हॅलेन्टाइन डे व फ्रेंडशिप डे यातून तुम्ही काय बोध घ्यावा, रेव्ह पार्टी व चिल्लर पार्टी यातून लोप पावत चाललेली संस्कृती, हुंडाबळी, बेटी बचाव मोहीम, महिला अत्याचार यासाठी हाती घेई मशाल हे विषय आहेत. महिलांसाठी पारंपरिक सणवार व त्यांचे समाजात असलेले स्थान, स्त्री असूया, स्त्रीजन्मा तुझी कहाणी तर ज्येष्ठांसाठी तू तिथे मी, आयुष्यावर बोलू काही, वृद्धाश्रम शाप की वरदान हे विषय निबंधासाठी असून २० ऑक्टोबरपर्यंत ८०० शब्दमर्यादेपर्यंत लिखाण करून बी. रघुनाथ सभागृह येथे फेस्टीव्हलच्या कार्यालयात दाखल करावेत.
‘सबका मालिक एक’ महानाटय़ासह पती सारे उचापती, गाढवाचे लग्न ही नाटके तसेच लावण्यखणी हा लावणीचा कार्यक्रम असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम फेस्टीव्हलमध्ये आहेत. स्थानिक कलावंतांच्या सहभागावर आधारित कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. परभणीकरांनी कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन फेस्टीव्हलचे अध्यक्ष महापौर प्रताप देशमुख, उपाध्यक्ष भगवान वाघमारे, कार्याध्यक्ष विजय जामकर, उपमहापौर सज्जूलाला, दिलीप ठाकूर, कार्यवाह आयुक्त सुधीर शंभरकर, अतुल सरोदे, बंडू बांचलिंग, सविता संगेवार यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा