पुणे महापालिकेने बचत गटातील महिलांसाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे यांचा रुसवा फुगवा चांगलाच गाजला. खासदार रजनी पाटील येईपर्यंत उद्घाटनासाठी थांबा, अशी विनंती खासदार सुळे यांना काँग्रेसच्या नगरसेविकांनी केल्यानंतर खासदार सुळे भडकल्या आणि त्या उद्घाटनातूनच निघून गेल्या. त्यांच्या संतापामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीमधील संघर्षदेखील हजारो महिलांसमोर उघड झाला.
बचत गटातील महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम महापालिकेच्या महिला, बाल कल्याण समितीने आयोजित केला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या मेळाव्याचे उद्घाटन शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार रजनी पाटील यांच्या उपस्थितीत आयोजिण्यात आले होते. सुरुवातीला बचत गटांचे उद्घाटन खासदार सुळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर महिला महोत्सवाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने केले जाणार होते. त्यासाठी खासदार सुळे जायला लागल्यानंतर त्या खासदार पाटील यांच्यासाठी थांबत नसल्याचे काही नगरसेविकांच्या लक्षात आले. त्यामुळे नगरसेविका सुनंदा गडाळे यांनी ‘पाटील ताई येत आहेत, तोपर्यंत थांबा,’ अशा शब्दात सुळे यांना थांबण्याची विनंती केली.
ही विनंती ऐकून सुळे भडकल्या. मी प्रसिद्धीसाठी येथे आलेली नाही. त्यासाठी मी काही करत नाही. मला प्रसिद्धीची गरज नाही. असे म्हणत त्यांनी हातातील मेणबत्तीही दुसरीच्या हातात दिली आणि त्या तेथून निघून गेल्या. त्यानंतर पदाधिकारी महिलांनी विनंती करून त्यांना परत बोलावून आणले. मात्र तोवर या गोंधळात संयोजकांनी उद्घाटन झाल्याचे जाहीर करून टाकले होते.
या प्रकारानंतर महापौर वैशाली बनकर यांनी मला माफी मागण्यास सांगितले होते. मात्र, सुळे या मोठे पद सांभाळत असल्यामुळे त्यांनी त्या पदावर मोठय़ा मनाने राहावे, अशी प्रतिक्रिया नगरसेविका गडाळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. या उलट असा काही प्रकारच घडला नाही, असा दावा महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल सरवदे यांनी केला.
कार्यक्रमातही या दोन खासदारांमध्ये महिलांना आरक्षण कोणी दिले या मुद्दय़ावरून चांगलीच जुगलबंदी झाली. एकूणच बचत गटातील महिलांच्या या मेळाव्यात महिला नेत्यांचे रुसवे फुगवे, परस्परांवरील राग, वाद यांचेच दर्शन उपस्थित महिलांना झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली.

Story img Loader