मराठी वाहिन्यांवरील संगीत रिअॅलिटी शो आता चांगलेच स्थिरावले आहेत. रसिकप्रेक्षकांमध्ये सर्वच संगीत रिअॅलिटी शोंना मिळणारा प्रतिसाद, त्याची घेतली जाणारी दखल आणि त्याचा सहभागी कलावंतांना होणारा फायदा आणि महाराष्ट्रभरातून संगीत क्षेत्राला मिळणारे गुणवान गायक-गायिका यामुळेही या रिअॅलिटी शोंचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. गजेंद्र सिंग यांच्या संकल्पनेतून तयार झालेला ई टीव्ही मराठी वाहिनीवरच्या ‘गौरव महाराष्ट्राचा’ या रिअॅलिटी शोच्या ‘सूर गृहलक्ष्मीचा’ या नुकत्याच झालेल्या पर्वाची विजेती ठरली धनश्री देशपांडे. लग्नानंतर अमरावतीला राहणारी धनश्री देशपांडे मूळची नांदेडची आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ अशा दोन्ही परिसरांतील प्रेक्षकांच्या आनंदाला पारावर राहिलेला नाही. रविवार, १० मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता महाअंतिम सोहळा पाहायला मिळणार आहे.
आतापर्यंत लहान मुलांचे, तरुणाईचे असे म्युझिक रिअॅलिटी शो झाले. परंतु, ‘गौरव महाराष्ट्राचा’ या रिअॅलिटी शोअंतर्गत राज्यातील तमाम मराठी गृहिणींना आपले गाणे अवघ्या महाराष्ट्राला ऐकवण्याची संधी मिळावी आणि त्यातूनही चांगल्या गुणवान गायिका लोकांपुढे याव्यात या उद्देशाने ‘सूर गृहलक्ष्मीचा’ या आगळ्यावेगळ्या पर्वाचे आयोजन केले गेले.
गृहिणींना आपले गाणे लोकांसमोर आणण्याची ही संधी तमाम गृहिणींनी आवर्जून घेतली आणि भरभरून सहभाग नोंदविला. मुंबईत नुकत्याच झालेल्या महाअंतिम सोहळ्यात धनश्री देशपांडेने पहिला मान पटकाविला. तिला एक लाख २५ हजार रुपयांचा धनादेश आणि महिंद्रा क्वोन्टो कार आणि सन्मानचिन्ह असे घसघशीत पारितोषिक देण्यात आले. दुसरा क्रमांक शर्वरी जाधव हिने पटकाविला. तिला ७५ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह तर तिसऱ्या क्रमांकाची विजेती ठरलेल्या ज्योती गोराणे हिला ५० हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह अशी पारितोषिके देण्यात आली.
या महाअंतिम सोहळ्याची सुरुवात मानसी नाईकच्या धमाकेदार नृत्याने झाली. उर्मिला कानेटकर, क्रांती रेडकर, साक्षी तिसगावकर, आशुतोष पत्की, खुशबू तावडे, रेश्मा शिंदे यांनीही नृत्याविष्कार सादर केले. मराठी चित्रपटांची शतकी वाटचाल या विषयावर आधारित कार्यक्रम दीपाली सय्यदने नृत्य सादर केले. मराठी वाहिनीवर प्रथमच स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात आले.
विक्रम गोखले यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे ‘स्वराधीश’ अर्थात सुरेश वाडकर तसेच परीक्षक सलील कुलकर्णी, बेला शेंडे यांनीह गाणी सादर केली. या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते ते म्हणजे गायिका उषा उत्थूप. उषा उत्थूप यांच्या हस्ते अनुराधा पौडवाल यांनाही स्त्री शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले.
आपल्या खुमासदार आणि समर्पक सूत्रसंचालनाने लोकप्रिय ठरलेल्या पल्लवी जोशीनेच महाअंतिम सोहळ्याचे सूत्रसंचालन केले असून महाअंतिम सोहळा रविवारी पाहायला मिळणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा