राहुल गांधी यांच्या जंगी स्वागतासाठी अमरावती मार्गावरील सुराबर्डी मिडोज पंचताराकित फार्म हाऊसचा परिसर सज्ज झाला आहे. या बैठकीसाठी विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील लोकप्रतिनिधी नागपुरात येणे सुरू झाले असून त्यांची व्यवस्था शहरातील काही हॉटेल्समध्ये तर काहींची सुराबर्डीमध्ये करण्यात आली आहे.
एकीकडे सेवाग्राममध्ये अखिल भारतीय युवा काँग्रेसच्या बैठकीला आजपासून प्रारंभ झाल्यामुळे युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी बैठकीत व्यस्त आहेत. त्यामुळे सुराबर्डीची जबाबदारी प्रदेश काँग्रेस समिती आणि शहर काँग्रेसकडे सोपविण्यात आली आहे. एकूणच व्यवस्थेवर चंदन यादव लक्ष ठेवून आहेत. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या जबाबदारी देण्यात आल्यामुळे पदाधिकाऱ्यांची लगबग वाढली आहे. राहुल गांधींसाठी विमानतळ आणि सुराबर्डी परिसरात झेंडे, पताका आणि होर्डिग्ज लावण्यात आली आहेत.
 सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांचे सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह राज्यातील प्रमुख मंत्र्यांनाच प्रवेश दिला जाईल. सुराबर्डी परिसरात बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे ओळखपत्र असलेल्या पदाधिकाऱ्यालाच प्रवेश मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सुराबर्डी मिडोजमध्ये दोन मोठे वातानुकुलित सभागृह असून त्यातील एका सभागृहात राहुल गांधी संवाद साधतील तर दुसऱ्या सभागृहात पदाधिकारी थांबणार आहेत. फार्म हाऊसवर २४ वातानुकुलित आलिशान सूट असून त्यात केंद्र आणि राज्यातील मंत्री व अखिल भारतीय कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी राहणार असल्याचे सांगण्यात आले. मराठवाडा, खानदेश व विदर्भातील प्रमुख आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची सोय रविभवनासह विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. सुराबर्डीमध्ये हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे. या दौऱ्याच्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाला सतर्क करण्यात आले असून आजच पोलीस यंत्रणेतील उच्चाधिकाऱ्यांनी सुरक्षेचा आढावा घेतला.  सुराबर्डी परिसरात आज सकाळपासून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. शिवाय राहुल गांधींना झेड श्रेणीची सुरक्षा व्यवस्था असल्याने दिल्लीवरून एसपीजीचे कमांडो नागपुरात पोहचले आहेत. विमानतळ ते सुराबर्डी या मार्गावर वाहतूक २०० पेक्षा अधिक वाहतूक पोलीस  तैनात राहतील. शिवाय जागोजागी कमांडो पथकाचे तसेच साध्या वेशातील जवानही तैनात राहणार आहेत. सुराबर्डी परिसरात बैठकीसाठी येणारी वाहने तपासण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र व्यवस्था आहे. शिवाय सुराबर्डीला प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा