परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी सुरेश धस यांची नियुक्ती झाली आहे. शनिवारी या संदर्भातील अधिकृत निर्णय कळविण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय रेंगाळला होता.
प्रकाश सोळंके यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर परभणीचे पालकमंत्रिपद रिक्त झाले होते. सोळंके यांच्यानंतर फौजिया खान यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्याची मागणी माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या समर्थकांकडून शिष्टमंडळाद्वारे पक्षाकडे केली होती. दरम्यान, पालकमंत्री धस की खान हा तिढा गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या पक्षीय पातळीवर कायम होता. अखेर धस यांच्या नियुक्तीने हा तिढा सुटला आहे. परभणी जिल्ह्यास बाहेरचा पालकमंत्री ही परंपरा धस यांच्या नियुक्तीने पुन्हा सुरू झाली. जिल्ह्यात पालकमंत्रिपदाचा वाद कायम असताना स्वातंत्र्यदिनाचे ध्वजवंदन धस यांच्या हस्ते झाले होते. परभणी जिल्ह्याच्या मंत्र्याकडे पालकमंत्रिपद येण्याऐवजी ते शेजारच्या बीड जिल्ह्यात जाण्यासाठी पक्षांतर्गत गटबाजीचेच कारण सबळ ठरले आहे.

Story img Loader