शहरात रविवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होत असून येथे प्रथमच त्यांची सभा होत असल्याने त्याविषयी आकर्षण असले तरी प्रत्येक सभेत तेथील स्थानिक वजनदार नेत्यांच्या कार्यशैलीवर टीकास्त्र सोडण्याचे धोरण स्वीकारणारे राज ठाकरे हे घरकुल घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांच्याविषयी काय भूमिका घेतात याविषयी अधिक उत्सुकता आहे. याशिवाय अलिकडेच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हेही ठाकरे यांच्या रोषाचा बळी पडले असून खडसे हेही स्थानिक असल्याने ठाकरे पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका करतात की काय, याचीही भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
ठाकरे यांची सभा विक्रमी ठरावी, यासाठी मनसेचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी दिली. ठाकरे यांच्या कोल्हापूर, खेड, सोलापूर, जालना येथील सभांप्रमाणेच जळगावच्या या उत्तर महाराष्ट्र विभागीय सभेला गर्दी होईल असा विश्वासही बाविस्कर यांनी व्यक्त केला. महापालिका तसेच जिल्हा सहकारी बँकेतील कोटय़वधींच्या घोटाळ्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात जळगावची बदनामी झाल्याबद्दल बाविस्कर यांनी यावेळी संताप व्यक्त केला. महापालिकेतील घरकुल घोटाळ्याप्रकरणी आमदार सुरेश जैन यांच्यासह काही माजी महापौर, बरेच आजी-माजी नगरसेवक व जैन समर्थकांना अटक करण्यात आली होती. आ. जैन अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहेत. सुरेश जैन यांच्याकडेच वर्षांनुवर्ष जळगावची सत्ता राहिली आहे. असे असतानाही इतर शहरांच्या तुलनेत जळगावचा विकास झालेला नाही. सगळीकडे अस्वच्छता, अतिक्रमणांनी व्यापलेले चिंचोळे रस्ते, वाढती गुन्हेगारी, जैन समर्थकांची दादागिरी, नव्या प्रकल्पांची वानवा या सर्वाचा समाचार राज ठाकरे आपल्या भाषणात घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेषत्वाने जैन यांच्याविषयी ठाकरे हे कोणते धोरण स्वीकारतात हेही त्यांच्या भाषणातून दिसणार आहे. प्रत्येक सभेत तेथील प्रस्थापित स्थानिक नेत्यांवर टीका केल्यास हमखास उपस्थितांकडून प्रतिसाद मिळतो याचे गणित राज यांना अवगत झाले आहे. याशिवाय भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारे राज हे एकनाथ खडसे यांनाही आपल्या टीकेचे लक्ष्य करतात किंवा काय, याविषयीही सर्वामध्ये उत्सुकता आहे.
रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास सागर पार्क मैदानावर होणाऱ्या या सभेच्या तयारीत कोणतीही कसूर राहू नये यासाठी पक्षाच्या वतीने काळजी घेण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्र विभागीय असे या सभेचे स्वरूप असल्याने आणि जळगावमध्ये प्रथमच राज यांची सभा होणार असल्याने सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. रविवारची सभा झाल्यानंतर सोमवारी राज हे जळगाव येथील न्यायालयात दाखल होणार आहेत. २८ ऑक्टोबर २०१२ मध्ये दाखल एका गुन्ह्याप्रकरणी त्यांना न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे, अशी माहिती बाविस्कर यांनी दिली.

Story img Loader