तेरा महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार सुरेश जैन यांना जामीन मंजूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा देणाऱ्या राजर्षि शाहू ब्रिगेडची भूमिका जैन यांना अधिकच अडचणीत आणू शकेल हे लक्षात घेत कायद्याला त्यांचे काम करू द्या, आंदोलनाच्या भानगडीत पडू नका, असा सल्ला जैन यांच्या आघाडीकडून देण्यात आला आहे.
ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात जैन यांच्या जामिनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. घरकुल घोटाळ्याच्या गुन्ह्यात सुरेश जैन हे १० मार्च २०१२ रोजी अटक झाल्यापासून ते आजपावेतो न्यायालयीन कोठडीत आहेत.
जैन यांचे बोट धरून ज्या व्यक्ती मोठय़ा पदापर्यंत गेल्या त्यांनीही जैन यांची साथ सोडल्याचा उल्लेख निवेदनात आहे. या निवेदनानंतर जामिनासाठी आंदोलन म्हणजे जैन यांची डोकेदुखी अधिकच वाढविण्याचा प्रकार म्हटला जात आहे. आमदार सुरेश जैनप्रणीत खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश जैन यांनी शाहू ब्रिगेडच्या ज्या व्यक्तींनी आंदोलनाचा इशारा दिला त्यांना सुरेश जैन व्यक्तिश: ओळखत नाहीत. त्यामुळे त्यांच्या इशाऱ्याशी जैन यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जैन यांनी आधीपासूनच अशी भूमिका घेतली असती, आपल्या कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाला आवर घातला असता तर सध्याची वेळ आली नसती, असे म्हटले जात आहे.

Story img Loader