एक महिना लांबणीवर पडलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीची औपचारिकता गुरुवारी पार पडली असून तुर्भे स्टोअर येथील प्रभाग क्रमांक ४२ मधील राष्ट्रवादीचे नगरसेवक सुरेश शिवाजी कुलकर्णी यांची फेरनिवड जाहीर करण्यात आली आहे. मध्यंतरी घडलेल्या कुलकर्णी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्य़ात पालकमंत्री गणेश नाईक यांनी काहीच मदत न केल्याने कुलकर्णी नाराज होते. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांची हे फेरनिवड करण्यात आल्याची चर्चा आहे.
नाईक चिंरजीव आमदार संदीप नाईक यांच्यानंतर स्थायी समितीत फेरनिवड झालेले कुलकर्णी हे दुसरे सदस्य आहेत. कुलकर्णी यांच्या फेरनिवडीमुळे स्पर्धेत असलेले कोपरखैरणे येथील केशव म्हात्रे, विक्रम शिंदे, अनंत सुतार हे सदस्य नाराज झालेले आहेत.
नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्य संख्या आहे. नऊ सदस्य असणाऱ्या पक्षाचा सभापती होत असल्याने राष्ट्रवादीची त्यात मक्तेदारी आहे. त्यामुळे सभापती निवडीची केवळ औपचारिकता केली जात असल्याचे दिसून येते. एक मे रोजी होणारी ही निवड या वर्षी ३५ दिवस लोकसभा निवडणुकीमुळे उशिराने झाली. ही निवड या सत्रातील शेवटची निवड असल्याने ती कोणाची होईल याबाबत उत्सुकता होती. त्यासाठी कोपरखैरणे येथील केशव अंकल म्हात्रे यांची निवड होईल अशी चर्चा होती.
कोपरखैरण्यात राष्ट्रवादीचे बुरुज ढासळण्याची शक्यता जास्त आहे. लोकसभा निवडणुकीत येथील मतदान घसरले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे दुसरे नगरसेवक शिवराम पाटील यांना शह देण्यासाठी केशव म्हात्रे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. नाईक यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या म्हात्रे यांना यापूर्वी कोणतेही महत्त्वाचे पद दिले गेलेले नाही.
अजातशत्रू असणारे म्हात्रे यांची वर्णी यावेळी स्थायी समितीवर लागण्याची चर्चा होती. दुसरे वाशीतील राजू शिंदे यांचे नाव चर्चेत होते. पण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना नाईक यांनी धक्कातंत्राचा वापर करीत कुलकर्णी यांची फेरनिवड करण्याचा निर्णय घेतला. कुलकर्णी हे नाईकांचे खंदे समर्थक मानले जातात. तुर्भे स्टोअर येथे त्यांची एकहाती सत्ता मानली जाते.
नाईकांचा नवी मुंबई बालेकिल्ला मानला जात असेल तर कुलकर्णीचा तुर्भे स्टोअर बालेकिल्ला मानला जातो. त्यांच्या कार्यशैलीमुळे येथील तीन नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. अशा भक्कम कार्यकर्त्यांला मध्यंतरी अॅट्रॉसिटीमध्ये गुतंवले जात होते. त्यावेळी नाईकांनी कुलकर्णी यांना मदत न केल्याने ते नाराज होते.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या विभागात कमी मतदान झाले होते. त्यामुळे म्हात्रे, पाटील, सुतार यांच्यापेक्षा कुलकर्णी यांची व्होट बँक जपण्यासाठी नाईकांनी त्यांची फेरनिवड करून त्यांना खूश करून टाकले आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या नगरसेवकांच्या प्रभागात जास्त मतदान झाले आहे, त्यांच्या गळ्यात ही माळ पडण्याची शक्यता होती. त्यात कुकशेतचे सूरज पाटील आघाडीवर होते. कुलकर्णी यांच्या फेरनिवडीमुळे राष्ट्रवादीतील नगरसेवक नाराज झाले आहेत.
नाईकांचा नाराजीवर फेरनिवडीचा उपाय
एक महिना लांबणीवर पडलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीची औपचारिकता गुरुवारी पार पडली असून तुर्भे स्टोअर येथील प्रभाग क्रमांक ४२
First published on: 06-06-2014 at 02:53 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh kulkarni elected standing committee chairman of nmmc