नवी मुंबई पालिकेची रखडलेली स्थायी समिती निवडणूक कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी एक वाजता नवीन मुख्यालयात होत असून या समितीतील एकूण १६ सदस्यांपैकी १० सदस्य हे राष्ट्रवादीचे असल्याने या पक्षाचा सभापती होणार हे स्पष्ट आहे. त्यासाठी कोपरखैरणे येथील केशव म्हात्रे, कुकशेत येथील सूरज पाटील आणि ऐरोली येथील एम. के. मढवी या तिघांची नावे चर्चेत असतानाच पुन्हा सुरेश कुलकर्णीची सभापतीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. सलग दुसऱ्यांदा सभापतीपदाची कुलकर्णी यांच्या गळ्यात माळ पडणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी काँग्रेस-शिवसेना छुपी युती होण्याची शक्यता असून या युतीला राष्ट्रवादीतील दोन सदस्य सहकार्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी या वर्षी गाफील नाही.
नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांची मुदत १ मे रोजी संपलेली. त्यांच्या जागी नवीन सभापतीची निवडणूक होणे क्रमप्राप्त होते पण लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ही निवडणूक लांबणीवर पडली. ती आता गुरुवारी ५ जून रोजी होत असून त्यासाठी कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार हे निरीक्षक राहणार आहेत. सुरेश कुलकर्णी, केशव म्हात्रे, विक्रम शिंदे, शिवराम पाटील, रेखा म्हात्रे, मनोद हळदणकर, विजयानंद माने, सिंधू नाईक या जुन्या सदस्यांबरोबरच भरत नखाते, अनंत सुतार, रविकांत पाटील, एम. के. मढवी, विठ्ठल मोरे, विजया घरत, सूरज पाटील आणि अमित पाटील हे आठ नवीन असे सर्वपक्षीय १६ स्थायी समितीचे सदस्य आहेत.
सुरुवातीला म्हात्रे, पाटील, मढवी यांची नावे चर्चेत असताना सुरेश कुलकर्णी यांच्या नावाला पुन्हा एकदा पसंती देण्यात आल्याचे समजते. त्याचप्रमाणे या समितीत शिवसेना-भाजप व काँग्रेसचे सहा सदस्य आहेत. त्यांना राष्ट्रवादीचे तीन सदस्य गळाला लागल्यास ही निवडणूक चुरशीची व तिजोरीच्या चाव्या विरोधकांच्या हातात जाणारी ठरू शकते अशी चर्चा आहे. देशात आणि राज्यात राजकारणाचे बदलणारे वारे लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे अनेक नाराज नगरसेवक शिवसेना-भाजप महायुतीच्या संपर्कात असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा