महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे स्थानिक आमदार सुरेश नवले यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या छोटय़ामोठय़ा कार्यकर्त्यांना निमंत्रित करून सरकारी कार्यक्रमाचा पक्षीय मेळावाच केला. पालकमंत्र्यांच्या कुटुंबातील पाच व्यक्तींची नावे टाकून कार्यक्रमाला वैयक्तिक स्वरूप देण्यात आल्याचा आरोप करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध सभापतींकडे हक्कभंग दाखल करणार असल्याचा इशारा आमदार नवले यांनी दिला.
महावितरणच्या नवीन विद्युतप्रणाली सुधारणासाठीच्या ४० कोटींच्या सरकारी उद्घाटनाचा कार्यक्रम रविवारी बार्शी नाका येथे झाला. शासकीय प्रोटोकॉलनुसार स्थानिक आमदारांना या कार्यक्रमाला निमंत्रित करणे आवश्यक असते. मात्र, काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य प्रा. सुरेश नवले यांना या कार्यक्रमाला बोलावलेही नाही व निमंत्रणपत्रिकेवर नावही टाकले नाही. राष्ट्रवादीचे नेते, पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला गेवराईचे आमदार बदामराव पंडित यांना अध्यक्ष करण्यात आले, तर जयदत्त क्षीरसागर यांच्या कुटुंबातील नगराध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, गजानन कारखान्याचे अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, आरोग्य व शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आमदार सय्यद सलीम, जनार्दन तुपे, डी. बी. बागल व अरुण डाके यांची नावे निमंत्रणपत्रिकेत छापण्यात आली. पक्षीय पातळीवर दोन्ही काँग्रेसची आघाडी असली, तरी स्थानिक पातळीवर मात्र नेत्यांमध्ये कुरघोडीच्या राजकारणाची संधी सोडली जात नाही. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या दबावालाखाली हा कार्यक्रम घेऊन काँग्रेसच्या आमदारांना डावलले, असा आरोप काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला, तर कार्यक्रमानंतर आमदार नवले यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध विधान परिषद सभापतींकडे हक्कभंग दाखल करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून मानापमानाचा संघर्ष सुरू झाला आहे.

Story img Loader