माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व माढेश्वरी नागरी सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्रदान शिबिरात मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तथा ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी ३८६ नेत्ररुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. या शिबिराचे यंदाचे सहावे वर्ष होते.
पद्मश्री डॉ. लहाने व त्यांच्या सहकारी डॉ. रागिणी पारेख यांनी या शिबिरात ११०० गोरगरीब नेत्ररुग्णांची तपासणी केली असता त्यापैकी ७०० रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे आढळून आले. यापैकी ३८६ रुग्णांवर दोन दिवसात शस्त्रक्रिया करण्यात आल्या. उर्वरित रुग्णांवर येत्या काही दिवसात पुणे व मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहेत.
माढय़ाचे आमदार तथा विठ्ठलराव शिंदे सहकारी बँकेचे अध्यक्ष बबनराव शिंदे हे गेल्या सहा वर्षांपासून नेत्ररोग शिबिराचे आयोजन करीत असून प्रत्येक शिबिराला पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व डॉ. राागिणी पारेख यांनी हजेरी लावून रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. या नेत्र शिबिराच्या माध्यमातून डॉ. लहाने यांचा माढा तालुक्याशी ॠणानुबंध जुळला आहे.
या नेत्र शिबिराचा समारोप आमदार बबनराव शिंदे व कुर्डूवाडीचे लेखक प्रा. डॉ. राजेंद्र दास यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, राजाभाऊ चवरे, माढेश्वरी बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत यांचीही उपस्थिती होती. यावेळी आमदार शिंदे यांनी, वृध्दांच्या कौटुंबिक समस्या सार्वत्रिक स्वरूपात दिसतात. आपल्या माढा मतदारसंघातील गोरगरीब वृध्द नेत्ररुग्णांना दर्जेदार मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून घेणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याने या शिबिराचे आयोजन केल्याचे नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा