मलकापूर नगरपंचायतीने सन २०१३-१४ सालासाठी ४५ कोटी ४३ लाख ६९ रूपये उत्पन्नातून ४५ कोटी ३६ लाख ६३ हजार पाचशे रूपयांच्या खर्चाची तरतूद करून ७ लाख ५ हजार ९९९ रूपये शिलकीचा अर्थसंकल्प जाहीर केला. नगरपंचायतीच्या विशेष सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पास एकमताने मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा नूरजहाँन मुल्ला होत्या. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी हेमंत निकम या वेळी उपस्थित होते.  
नगरपंचायतीच्या उत्पन्न स्त्रोतामध्ये संकलित कर, पाणीपट्टी, व्यवसायकर, नगरपंचायत मालकीच्या इमारतीचे भाडे व शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानाचा समावेश असून, नागरी सुविधांबरोबर, सार्वजनिक रस्ते, सांडपाणी विल्हेवाट, दिवाबत्ती सोय, वृक्षारोपण आदी कामासाठी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नगरपंचायतीच्या प्रस्तावित भुयारी सांडपाणी गटार योजनेसाठी १० टक्के लोकवर्गणीपैकी पहिल्या हप्त्यापोटी १७ लाख रूपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली गेली आहे. मलकापूर नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीसाठी ३ कोटींचा निधी मंजूर केला असून, अंदाजपत्रकीय रक्कम ४ कोटी ४७ लाख रूपये असल्यामुळे या ज्यादा खर्चासाठी ७५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मलकापूर सोलर सिटी अंतर्गत २ सौर दिवे व १ वॉटर हिटर तसेच एलईडी बसविण्यासाठी २ कोटी ६० लाख रूपयांची तरतूद, संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत १५३ शौचालय बांधणेसाठी प्रति युनिट १० हजार प्रमाणे १० लाख, तर गोबर गॅसकरता प्रतिलाभार्थी १० हजार प्रमाणे ५ लाख तरतूद करण्यात आली आहे. याबरोबरच मलकापूर शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ५ लाखांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. दारिद्रय़ रेषेखालील व मागासवर्गीय नागरिकांकरिता नागरी घरकुल योजनांतर्गत ६७ लाभर्थीना दीड लाख अनुदानाची तरतूद केली आहे. तसेच वृक्ष लागवड योजनांतर्गत ५० हजार वृक्ष लागवडीकरता ३ लाख रूपयांची तरतूद, विमा योजना राबविण्याचा संकल्प असून, यासाठी ५ लाखांची तरतूद करण्यात आली.
कराडातील शारदीय व्याख्यानमालेच्या धर्तीवर मलकापुरात श्रीमती प्रेमलाताई चव्हाण व्याख्यानमालेची सुरूवात करण्यात येणार असून, त्यासाठी १ लाखांची तर युवकांसाठी व्यायामशाळा कार्यान्वित करण्यासाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर ‘लेक वाचवा’ अभियानांतर्गत प्रियदर्शनी कन्यारत्न योजनेंतर्गत १५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मलकापूर शहरविकास आराखडय़ांतर्गत आरक्षित केलेल्या भाजी मंडई, टाऊन हॉल, क्रीडा संकुल, बगिचा विकसित करण्यासाठी १ कोटी ४० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रभागांतर्गत विकासकामांसाठी प्रति नगरसेवक २ लाख रूपयेप्रमाणे ३५ लाखांची तरतूद करण्यात आली असून, घनकचरा व्यवस्थापनासाठी १३ व्या वित्त आयोगातून प्राप्त होणाऱ्या निधीतून या प्रकल्पासाठी १ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा