नक्षलवाद्यांसाठी पोलिसांनी सुरू केलेली आत्मसमर्पण योजना सुखी जीवनाचा मार्ग आहे. यातून माझ्या जीवनाला नवी दिशा मिळाली, असे मनोगत आत्मसमर्पित नक्षलवादी उमेशने (बदललेले नाव) व्यक्त केले.
पोलीस दलाच्या सुराबर्डी नक्षलविरोधी अभियानाच्या विशेष माहिती व जनसंपर्क कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवरील मरकंडी येथील रहिवासी उमेश २२ वर्षांचा आहे. त्याच्या कुटुंबात सध्या वयोवृद्ध वडील व तीन भाऊ आहेत. प्रत्येक घरातून एक मुलगा व एक मुलगी नक्षलवादी चळवळीत देण्याची धमकी नक्षलवाद्यांकडून कुटुंबाला नेहमी मिळत होती. घरी रोजगाराचे साधन नव्हते, त्यामुळे कुटुंबाचा विचार करून इच्छा नसतानाही १५ वर्षांचा असताना २००६ मध्ये नक्षल चळवळीत प्रवेश केला. पानावली, भामरागड, गट्टा, पिरमिल, गडचिरोली येथे विविध दलममध्ये राहून चळवळीची कामे केली. चळवळीतील लोकांसाठी जेवण तयार करणे व नक्षलवाद्यांची बैठक असली की आजुबाजूच्या परिसरात पहारा देण्याचे काम केले. पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रसंग आला नाही, असे उमेश सांगत होता.
चळवळीत प्रत्येक वेळी मृत्यूचे भय होते. जीवनाचा कोणताच मार्ग चळवळीत दिसत नव्हता. अशातच पोलिसांच्या आत्मसमर्पण योजनेबद्दल माहिती मिळाली. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांसाठी शासन मदत करते, पुनर्वसन करते असे कळाल्याने चळवळीतून बाहेर पडावे व सुखी जीवन जगावे, असा निर्धार केला. २०११ मध्ये अहेरी येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर शासनाने २ लाखांचा धनादेश दिला. यातील ५० हजार रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित रक्कम मुलाच्या शिक्षणासाठी राखून ठेवली आहे. मुलाला शिकवून अधिकारी बनविण्याचे स्वप्न आहे. मजुरी करून कुटुंब चालविणे आणि मुलाला चांगले शिक्षण देणे, हेच आता जीवनाचे ध्येय आहे. गडचिरोलीत स्थायिक झालेला उमेश कुटुंबातील सदस्यांना भेटायला मूळ गावी गेला नाही. त्याच्या आईचे २००५ मध्ये निधन झाले. वडील व भावंडांना भेटण्यासाठी गेल्यास नक्षलवादी चळवळीतील लोक जिवंत ठेवणार नाहीत, त्यामुळे इकडेच सुखी व समाधानी आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातून घरकुलासाठी आणलेला अर्ज उमेशने दाखविला. शासनाने आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना घरकुल, शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र द्यायला हवे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा