करवीर निवासिनी महालक्ष्मीचे मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दल पथकाच्या तुकडीने शुक्रवारी मंदिर व परिसराची पाहणी केली. हे पथक संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्य़ातील संवेदनशील भागांची पाहणी करणार आहे. १० दिवस पथकाचे कामकाज चालणार असून त्यानंतर ते सुरक्षेचा अहवाल शासनाकडे सादर करणार आहे.     
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे डेप्युटी कमांडंट विकास सिंग, पोलीस निरीक्षक कुलदीप सिंग, तीन सहायक पोलीस निरीक्षक यांचा समावेश असलेल्या ९७ सैनिकांची तुकडी शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात आली. सुरक्षेच्यादृष्टीने मंदिर व परिसराची पाहणी केली. त्यानंतर बाबुजमाल दर्गा येथेही जाऊन पाहणी केली. राजवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विविध भागांना भेटी दिल्या. पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांच्याशी सुरक्षेबाबत चर्चा केली. तत्पूर्वी या पथकाने उजळाईवाडी विमानतळावर पाहणी केली. भविष्यात धोका उत्पन्न होऊ शकणाऱ्या घटकांबद्दलचा अहवाल पथकाकडून बनविला जाणार आहे. त्याआधारे शासनाकडून सुरक्षेबाबतचे नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
मंदिराच्या जीर्णोद्धारास मंजुरी
दरम्यान साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिरात सुमारे १० कोटी रूपये खर्च करून दर्शनमंडप व जीर्णोद्धाराचे काम केले जाणार आहे. या कामाच्या नियोजनाबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा चर्चा केली.
महालक्ष्मी मंदिरामध्ये कांही महत्त्वाची कामे करणे गरजेचे आहे. मंदिराच्या सौंदर्यात भर पडावी व भक्तांची सोय व्हावी असा दुहेरी हेतू यामागे आहे. राज्य शासनाने दर्शनी मंडपासाठी ५ कोटी ८० लाख रूपये तर मंदिर जीर्णोद्धारासाठी ४ कोटी २० लाख रूपये मंजूर केले आहेत. हे काम करतांना पुरातत्त्व खात्याची परवानगी आवश्यक आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार काम करण्यात यावे, अशा सूचना बांठिया यांनी केल्या.
१० कोटी रूपये खर्चाची दोंन्ही कामे करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत निधी उपलब्ध होणार आहे. पुरातत्त्व खात्याकडून एखाद्या कामाला अडथळा आला तर त्याऐवजी दुसरे काम करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये िबदू चौक ते भवानी मंडप हा भाग हेरीटेज वॉक स्वरूपात विकसित केला जाणार आहे.