एरवी केंद्रिय रेल्वेमंत्रालयाच्या नियमीत अंदाजपत्रकाकडून नेहमीच निराशेचे सवय लागलेल्या नगरकरांना या वर्षीच्या अंतरीम अंदाजपत्रकाने मात्र आशेचे किरण दाखवला आहे. नगरकरांची जुनी मागणी असलेल्या दौंड वगळून (काष्टी-केडगाव चौफुला) पुणे रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला या अंतरीम अंदाजपत्रकात हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
केंद्रिय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी लोकसभेत रेल्वेचे अंतरीम अंतरीम अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकात नगर-काष्टी (श्रीगौंदे)-केडगाव चौफुला अशा प्रस्तावीत रेल्वेमर्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय मराठवाडय़ातील घाटनांदूर (अंबाजोगाई)-बीड-केज-मांजरसुंबा-जामखे-श्रीगोंदे या नव्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणालाही मंजुरी देण्यात आली आहे. पुणे-लखनौ आणि पुणे-हावडा या दोन नव्या रेल्वेगाडय़ाही नगरमार्गे धावणार आहेत. अंतरीम रेल्वे अंदाजपत्रकात या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या सोलापूर विभागीय समितीचे सदस्य हरजितसिंग वधवा यांनी या योजनांचे स्वागत केले.
नगरहून पुण्याला जाताना विनाकारण दौंडमार्गे मोठा वळसा घालावा लागतो. त्यात वेळ आणि पैसाही वाढतो. नगरहून दौंडला गेलेली रेल्वे पुण्याकडे जाताना दौंडहून पुन्हा व्ही आकारात मागे येऊन केडगाव चौफुला मार्गे जाते. यात नगरकरांचा मोठा वेळ खर्च होतो. त्यामुळे हा प्रवास रेल्वेने करण्यासही नगरकर किंवा पुणेकर तयार नसतात. खरतर नगर-पुणे असा थेट रेल्वेमार्ग बांधण्याची नगरकरांची जुनीच मागणी आहे. त्याला रेल्वेमंत्रालयाने अद्यापि प्रतिसाद दिलेला नाही, मात्र आजच्या अंतरीम रेल्वे अंदाजपत्रकात काष्टी-केडगाव चौफुला हे मधले अंतर जोडणाऱ्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाल्याने नगरकरांना नगर-पुणे अशा प्रवासासाठी नवा आशेचा किरण दिसू लागला आहे.
काष्टी-केडगाव चौफुला हे आंतर फारच कमी आहे. नगर-दौंड आणि दौंड-पुणे या मर्गावरील ही दोन गावे मधून जोडल्यास नगर-पुणे प्रवास सुमारे तास दीड तासाने कमी होईल. काष्टीहूनच गाडी केडगाव चौफुल्याकडे जाईल, त्यात दौंडला जाण्याची गरजच राहणार नाही. दौंडला इंजिन बदलण्यासाठी लागणारा सुमारे अर्धा ते पाऊण, काष्टीहून दौंडपर्यंत जाण्यासाठी लागणारा तेवढाच वेळ काष्टी-केडगाव चौफुला या प्रस्तावीत मार्गाने वाचणार आहे. सर्वेक्षण हा अगदीच प्राथमिक टप्पा असला तरी तो नगरकरांच्या दृष्टीने आशेचा किरण ठरेल.