एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी करावयाच्या भूसंपादनासाठी आज प्रांताधिकारी राजेंद्र पाटील व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांनी वडगाव गुप्ता येथील जमिनींची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. अशीच पाहणी उद्या (शनिवार) या पथकाकडून पिंपळगाव माळवी येथील जमिनीची केली जाणार आहे.
जमीन संपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कलम ३२ (२) अंतर्गत नोटिसा बजावल्या आहेत. त्यानुसार संबंधित जमीनमालकांनी त्यावरील आपले लेखी म्हणणे काही दिवसांपूर्वी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या प्रांताधिकारी पाटील यांच्याकडे गेल्या महिन्यात सादर केले. त्यातील वस्तुस्थिती तपासण्यासाठी पाटील, खेडकर यांच्यासह महामंडळाचे सर्वेअर, तलाठी यांच्या पथकाने पाहणी केली. उद्या पिंपळगाव माळवीची वस्तुस्थिती तपासल्यानंतर पाटील आपला अहवाल सरकारला सादर करतील.
जमीन संपादन करताना बागायती क्षेत्र त्यातून वगळले जाणार आहे, सरकारचे तसे धोरणच आहे, असे अधिकाऱ्यांनी आज वडगाव गुप्ताच्या ग्रामस्थांसमोर स्पष्ट केले. वडगाव गुप्तामधील २४५ हेक्टर जमीन संपादीत करण्याच्या हालचाली आहेत, त्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत.
आजच्या पाहणीवेळी अशोक शेवाळे, संपत डोंगरे, विजय डोंगरे, गणेश सातपुते, पाराजी डोंगरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. नियोजित संपादनातील सुमारे ७० टक्के क्षेत्र बागायती आहे, त्यात ४० ते ४५ जण माजी सैनिक आहेत, तेथे गहू, तसेच डाळिंब, संत्र्याच्या बागा व ऊस क्षेत्र आहे, ३० टक्के अल्पभूधारक आहेत, संपादन झाल्यास या अल्पभूधारकांपैकी ३० टक्के लोक भूमीहीन होतील, गावात सुमारे ३५० हेक्टर वन खात्याची जमीन आहे, अनेकांचे दूध धंदे आहेत, जमीन संपादनामुळे त्यांचेही उदरनिर्वाहाचे साधन गमावले जाईल, त्यामुळे संपादनास विरोध असल्याचे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
वडगाव गुप्तालगतच विळद घाट परिसरात सरकारच्याच मालकीची मोठी पडीक जमीन असून तेथे विस्तारीकरण करावे, असा पर्यायही ग्रामस्थांनी दिला आहे. वडगाव गुप्तातील जमीन संपादन केल्यास आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.   

Story img Loader