उरणमधील नौदलाच्या शस्त्रागार परिसराच्या सुरक्षेसाठी सुरक्षापट्टा म्हणून नौदलाला केगांव,म्हातवली, नागांव, बोरी पाखाडी परिसरातील जागा मोकळी हवी आहे. मात्र या परिसरातील शेतकरी व त्यांच्या राहत्या चार हजारापेक्षा अधिक घरांचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर २०११ ला बांधकाम विरहित परिसर करण्याचे आदेश दिलेले आहेत. याविरोधात येथील शेतकरी व रहिवासीही न्यायालयात गेले आहेत. १९९२ साली सुरक्षा पट्टय़ासाठी काढण्यात आलेली अधिसूचनाही कालमर्यादा संपल्याने व्यपगत झाली असल्याची भूमिका येथील संघर्ष समितीने घेतली आहे.
मात्र नौदल सुरक्षा पट्टय़संदर्भात आग्रही असून न्यायालयाने ७ लाख रुपये जमा करून सव्र्हे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सव्र्हेला सुरुवात करण्यात आलेली असून ५ मे २०१४ पर्यंत हा सव्र्हे पूर्ण करावयाचा आहे. त्यानंतर ८ मे २०१४ रोजी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.
दरम्यान, सव्र्हे करीत असताना नौदलाचे अधिकारी उपस्थित असावेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले असतानाही नौदलाच्या अधिकाऱ्याविनाच सव्र्हे होत असल्याची माहिती संघर्ष समितीची वकील अॅड. पराग म्हात्रे यांनी दिली आहे. नौदलाच्या मुख्य ठिकाण निश्चित करून एक हजार यार्डापासून जमिनीचे सर्वेक्षण करावयाचे असताना अधिसूचनेतील शेवटच्या सव्र्हे नंबरवरून सव्र्हे सुरू केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.