सूर्याश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे साहित्य क्षेत्रातील योगदानाबाबत देण्यात येणारा साहित्य सन्मान पुरस्कार प्रकाश केळकर, नवोन्मेष पुरस्कार संगीता पिज्दूरकर व कलायात्री पुरस्कार नाटय़ कलावंत हिरालाल पेंटर यांना जाहीर झाले आहेत. येत्या ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहांकितचे अध्यक्ष डॉ.जाकीर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी वसंत वाहोकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर यवतमाळ येथील कवी सुरेश गांजरे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल. प्रकाश केळकर यांचा ‘आकाशाचे दान’ हा कवितासंग्रह व क्रमांक ४४ हा कथासंग्रह प्रकाशित असून मागील ३० वर्षांपासून ते सातत्याने काव्य व कथालेखन करत आहेत. संगीता पिज्दूरकर या नव्या जाणिवांच्या कवयित्री व कथालेखिका असून त्यांचा ‘मनपक्षी’ हा कवितांचा छोटेखानी व सप्तरंग कवितेचे हा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे, तर कथा मराठीतील नियतकालिकातून प्रकाशित होत आहेत. हिरालाल पेंटर झाडीपट्टीतील ख्यातकीर्त नाटय़ कलावंत व नाटककार आहेत. त्यांनी अनेक नाटकातून भूमिका साकारली आहे. सुर्याश साहित्य सन्मान आतापर्यंत डॉ. इसादास भडके, आशीष देव, मनोज बोबडे, दादा देशकर, सरिता जांभूळे, अ‍ॅड. एकनाथ साळवे यांना व नवोन्मेष पुरस्कार जितेंद्र भोयर, रत्नाकर चटप, दीपक शिव व रविकांत वरारकर यांना, तसेच मागील वर्षांपासून देण्यात येणारा कलायात्री पुरस्कार दिलीप अलोणे यांना देण्यात आलेला आहे.