अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या सोलापूर शाखेच्या वतीने सुशील करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धाना उद्या शुक्रवारपासून सोलापूरच्या हुतात्मा स्मृतिमंदिरात प्रारंभ होत आहे. या एकांकिका स्पर्धेत २१ एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.
या एकांकिका स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उद्या शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता सिनेनाटय़ अभिनेत्री नेहा पेंडसे यांच्यासह महापौर अलका राठोड व आमदार दिलीप माने यांच्या उपस्थितीत होणार आहे. नाटय़ परिषदेच्या सोलापूर शाखेचे कार्यवाह विष्णू संगमवार व उपाध्यक्ष विठ्ठल बडगंची यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक विजेत्या संघाला सुशील करंडक व २५ हजार, प्रमाणपत्र, तर द्वितीय संघाला स्मृतिचिन्ह व १५ हजार व प्रमाणपत्र आणि तृतीय संघाला स्मृतिचिन्ह, १० हजार व प्रमाणपत्र याप्रमाणे बक्षिसे दिली जातील. याशिवाय उत्कृष्ट दिग्दर्शन, स्त्री व पुरुष अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना व पाश्र्वसंगीतासाठी वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार असल्याचे बडगंची यांनी सांगितले. तसेच खास या स्पर्धेसाठी लिहिलेल्या पहिल्या तीन उत्कृष्ट एकांकिकांनाही रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविणयात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या स्पर्धेत सोलापूरसह पुणे, नाशिक, नांदेड, जयसिंगपूर आदी भागातील नाटय़संस्था सहभागी होणार आहेत. दि. २० रोजी सायंकाळी सात वाजता स्पर्धचा पारितोषिक वितरण सोहळा सिनेनाटय़ अभिनेते गिरीश कुलकर्णी व आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून तुषार भद्रे (सातारा), डॉ. राजेंद्र पोळ (सांगली) व वीणा लोकूर (बेळगाव) ही नाटय़ कलावंत मंडळी काम पाहणार आहेत, असे बडगंची यानी सांगितले. या वेळी संस्थेचे पदाधिकारी सुमित फुलमामडी, अ‍ॅड. एस. आर. तथा बाबू पाटील, मल्लिकार्जुन कावळे, सारिका अग्निहोत्री, अमृती अंदोरे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा