आतापर्यंत शहरातील झोपडपट्टी, मगासवर्गीय व अस्वच्छता असलेल्या वस्त्यांतच विविध आजार होत असल्याचा समज आहे, पण हा समज आता खोटा ठरू लागला आहे. शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या वस्त्यांमध्येच डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून येत आहेत. या वस्त्यांमध्ये विविध उपाययोजना सुरू असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.  
शहरातील हनुमाननगर, लकडगंज, लक्ष्मीनगर आणि नेहरूनगर या झोनमध्ये सर्वाधिक डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून येत आहेत. १ जानेवारी २०१४ पासून गेल्या आठ महिन्यांत शहरातील विविध भागात एकूण २२८ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले असून त्यातील ७ जणांना डेंग्यू झाल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. गेल्या एक महिन्यांपासून तर डेंग्यूचे संशयित व मलेरियाचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून येत आहेत. गेल्या एक महिन्यातच शंभराहून अधिक डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. असे असले तरी गेल्या आठ महिन्यात डेंग्यूने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचा अफलातून दावा महापालिकेचा आरोग्य विभाग करीत आहे.  
महापालिकेचा आरोग्य विभाग अजूनही सक्षम नसल्याचेच दिसून येत आहे. राज्य शासनाद्वारे चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयांवरच महापालिकेच्या आरोग्य विभागाची भिस्त आहे. महापालिकेचे १३ दवाखाने असले तरी या दवाखान्यांत नागपूरकर फारसे जातच नाहीत. त्याशिवाय मेडिकल, मेयो, डागा व अन्य रुग्णालयांतच जाण्यास प्राधान्य देतात. २५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात महापालिका औषधावर फक्त पाच ते दहा लाख रुपयेच खर्च करीत असल्याचे दिसून येते. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्याही अत्यल्प आहे. पुणे, मुंबई येथे महापालिकेची रुग्णालये असताना नागपुरात मात्र महापालिकेचे स्वतचे मोठे रुग्णालय नाही. जी आहेत, तेथे अत्याधुनिक यंत्रसामुग्री नाही. महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात शस्त्रक्रियेची सोय नाही. त्यामुळे नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग नागपूरकरांना आरोग्य सोयी देण्यात नापास झाला आहे.
शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. पाण्याचे डबके साचलेले दिसून येत आहे. हे दृष्य महापालिकेचे धिंडवडे काढण्यास पुरेसे आहे. सर्वत्र घाणीमुळे डासांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यातच सप्टेंबर महिन्याचे दमट वातावरण डास निर्माण होण्यास पोषक आहेत. प्रत्येक दुसऱ्या घरी कुणी ना कुणी आजारी आहे. कुणाला संशयित डेंग्यू तर कुणाला मलेरिया, तर कुणाला सर्दी-पडसे झाले आहे. शहरातील शासकीय रुग्णालयाप्रमाणेच खासगी रुग्णालयेही ‘हाऊस फुल्ल’ दिसत आहेत. विशेषत लहान मुलांची प्रतिकार क्षमता कमी असल्याने दोन ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांचे प्रमाण अधिक दिसत आहे. मध्यम व उच्च मध्यम वर्ग शासकीय रुग्णालयात न जाता खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेत आहेत. जवळपास ७५ ते ८० टक्के रुग्ण हे खासगी रुग्णालयात जाऊनच उपचार करून घेत असतात. त्यामुळे महापालिकेची व शासनाच्या रुग्णालयांची विविध आजारांची आकडेवारी फसवीच असल्याचे दिसून येते.
शहरात जवळपास सातशे खासगी रुग्णालये आहेत. या खासगी रुग्णालयातील इत्यंभूत माहिती प्राप्त करण्यासाठी महापालिकेजवळ कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयात डेंग्यूचा अथवा मलेरियाचा रुग्ण उपचार घेत असेल तर त्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाजवळ नसते. खासगी रुग्णालयांना त्यांच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची माहिती आमच्याकडे पाठवावी, असे निर्देश दिल्याचे महापालिकेचा आरोग्य विभाग सांगतो. परंतु या निर्देशाचे पालन खासगी रुग्णालये करतच नसल्याचे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होते. आपल्या आरोग्याची काळजी स्वत घ्यावी, असा सल्ला शहरवासियांना देण्याशिवाय महापालिकेकडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. आरोग्याची संपूर्ण अद्यावत माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे पाठवावी, असे निर्देश महापालिकेला देण्यात आले असताना त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे आरोग्य उपसंचालक कार्यालयात महापालिकेतील आरोग्याची माहितीच उपलब्ध नसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षीपेक्षा डेंग्यूचे रुग्ण कमी
शहरात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी डेंग्यूचे रुग्ण संख्येने कमी आढळून येत आहेत. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणीसाठी रक्त गोळा करीत आहेत. ताप आलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात येत असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच डासांना मारण्यासाठी फवारणी करण्यात येत आहे. शहरातील कचरा उचलण्यात येत आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग कटिबद्ध आहे.
– डॉ. जयश्री थोटे
आरोग्य अधिकारी (हिवताप व हत्तीरोग)

गेल्या वर्षीपेक्षा डेंग्यूचे रुग्ण कमी
शहरात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी डेंग्यूचे रुग्ण संख्येने कमी आढळून येत आहेत. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणीसाठी रक्त गोळा करीत आहेत. ताप आलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात येत असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच डासांना मारण्यासाठी फवारणी करण्यात येत आहे. शहरातील कचरा उचलण्यात येत आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग कटिबद्ध आहे.
– डॉ. जयश्री थोटे
आरोग्य अधिकारी (हिवताप व हत्तीरोग)