शहरात चोरी व घरफोडय़ांचे प्रकार वाढत असतानाच नाणेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळक्याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांत शहरात भुरटय़ा चोऱ्या, वाहनांची चोरी, घरफोडी असे प्रकार अव्याहतपणे सुरू आहे. उन्हाळी सुटीनिमित्त बाहेरगावी गेलेल्यांची घरे धुंडाळून ती चोरटय़ांनी लक्ष्य केल्याचे अधोरेखित होत आहे. याच काळात भुरटय़ा चोऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय वाढले. पोलीस असल्याची बतावणी करून महिलांचे दागिने खेचून नेण्याचे प्रकारही घडत आहेत. हा घटनाक्रम सुरू असतानाच नाणेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे पुलाच्या खाली संशयास्पदपणे काही जण फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चौकशी केली असता संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता संबंधितांकडे मिरची पावडर, नायलॉन दोरी, लोखंडी गज, लाकडी दांडके आदी साहित्य आढळून आले. हे टोळके दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. या संशयितांमध्ये शानु अशपाक शेख, सुनील ऊर्फ बारक्या पगारे, अन्नु ऊर्फ अनिल दास लखन, गणेश रमेश मंडलिक आणि अन्य एक अशा पाच जणांचा समावेश आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.