पावसाची झड व सूर्यदर्शन न झाल्याने जंतुसंसर्ग वाढला आहे. सर्दी व घसादुखीचा त्रास होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दीड महिन्यात औरंगाबाद शहरात स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्या सहा रुग्णांच्या लाळेचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. मंगळवारी आणखी एक संशयित रुग्ण घाटी रुग्णालयात दाखल झाला. केवळ स्वाइन फ्लूच नाही तर डासांच्या घनतेतही वाढ झाल्याने डेंग्यूपासून सावधानता बाळगण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, साथरोगापेक्षाही सर्पदंशाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.  
केवळ औरंगाबादच नाही तर अतिवृष्टी झालेल्या हिंगोली जिल्ह्य़ात स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सेनगाव येथील शिल्पा हागे (वय १६) यांना स्वाइन फ्लू झाल्याचे उघड झाले आहे. तिच्या वडिलांसह सेनगावात चार, तर कळमनुरीत दोन असे एकूण ६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक अशोक बोल्डे यांनी मंगळवारी सांगितले की, शिल्पा हागेला स्वाइन फ्लू झाल्याचे पुण्यातील प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालावरून उघड झाले. तिचे वडील नारायण गणपत हागे (वय ६५) यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सेनगाव ग्रामीण रुग्णालयात प्रल्हाद विठोबा धोत्रे, बाळू तरडे व पल्लवी मदन कदम यांना उपचारासाठी दाखल केले. कळमनुरी ग्रामीण रुग्णालयात शेख दनिश शेख जावेद व दिनेश विजय राऊत या दोन संशयितांना मंगळवारी उशिरा हिंगोली जिल्हा रुग्णालयात पाठविल्याचे कळमनुरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुपक्कलवार यांनी सांगितले. संशयित सहा रुग्णांच्या घशातील लाळ तपासण्यासाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader