पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली असतांनाही १ कोटीची बिले महानगरपालिकेच्या उद्या, १० जुलैला होणाऱ्या विशेष आमसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. रस्त्यावरील डांबर वाहून गेल्यानंतर कंत्राटदारांनी बिले सादर केल्याने ही संपूर्ण कामेच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहेत.
महानगरपालिकेने शहरातील विविध प्रभागात १ कोटी ७१ लाखाची रस्त्यांच्या डांबरीकरण व सिमेंटीकरणाची कामे केली. कंत्राटदारांच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने यातील बहुतांश रस्त्यांवरील डांबर व सिमेंट वाहून गेले आहे. आज शहरातील विविध प्रभागात फेरफटका मारला असता रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडलेले व डांबर वाहून गेल्याचे चित्र बघायला मिळते. ही वस्तुस्थिती असतांनाही कंत्राटदारांची ही सर्व बिले मंजुरीसाठी उद्या बुधवारच्या विशेष आमसभेत ठेवण्यात आलेली आहे. यात तुकूम झोन क्रमांक १ मध्ये ४ लाख ४० हजार ८३२ रुपयाचे डांबरी रस्ता दुरुस्तीचे काम घेण्यात आले. त्यापाठोपाठ मिलन चौक ते पठाणपुरा गेटपर्यंत ४ लाख ७२ हजार ९२३ रुपयांचे डांबरी रस्ता दुरुस्तीचे काम, नार्मल स्कूल प्रभागात प्रशांत पवार ते रणवीर शंभरकर यांच्या घरापर्यंत ५ लाख ३ हजार ५७१ रुपयांचे डांबरीकरणाचे काम, जटपुरा गेट ते गांधी चौकापर्यंत रस्ता दुरुस्तीसाठी ४ लाख २४ हजार ५६५ चे काम, झोन क्रमांक ४ मध्ये ५ लाख १८ हजार ८८५ रुपये डांबरी रोड पॅचेसचे काम, साईबाबा वॉर्डात ४ लाख ४६ हजार ७९० रुपयांचे डांबरी रस्ता पॅचेसचे काम, कृष्ण नगर वॉर्डात गोवर्धन ते धांडे यांच्या घरापर्यंत ३ लाख ५५ हजार ८२२ रुपयांचे डांबरीकरणाचे काम, जटपुरा गेट ते गिरनार चौकापर्यंत ४ लाख ९५ हजाराचे डांबरी रोड पॅचेसचे काम घेण्यात आले आहेत.  आज या सर्व रस्त्यांची अवस्था बघितली तर रस्त्यांवरील डांबर निघून गेले आहे. खरेच या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते का, हा प्रश्न पडतो. असे असतांनाही आता या सर्व कामांचे बिल विशेष आमसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. रस्त्यांची अवस्था बघता ही सर्व कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाल्याचे निष्पन्न होते. रस्त्यांची ही दुरावस्था बघता ही संपूर्ण कामेच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहेत. मनपाने रस्त्यांची कामे केली असली तरी अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था बघता कामाचा दर्जा अतिशय सुमार असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

Story img Loader