गंगाखेडच्या व्यंकटेश विद्यालयातील कस्टोडियनच्या ताब्यात असलेल्या स्ट्राँग रूममधून दहावीच्या इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका बाहेर काढून त्या विद्यार्थ्यांकडून पुन्हा लिहून घेण्याच्या प्रकारातील आरोपी असलेल्या पाच शिक्षकांना निलंबित करण्यात आले. गटशिक्षणाधिकाऱ्यावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी या सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
गेल्या ७ मार्चला इंग्रजी विषयाच्या परीक्षेनंतर परीक्षा केंद्रावरून सर्व उत्तरपत्रिका गटशिक्षणाधिकारी एम. डी. काळे यांच्याकडे जमा करण्यात आल्या. या ठिकाणी काळे यांना सहकार्य करण्यासाठी इतर चार शिक्षकांची नियुक्ती केली होती. दुपारी साडेचारच्या सुमारास जि.प.चे शिक्षक कुबेर भीमराव खांडेकर व गटसाधन केंद्र गंगाखेड येथे कार्यरत असलेले कंत्राटी शिक्षक अनिल रंगनाथ कळणे यांना दोन उत्तरपत्रिकासह पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. दरम्यान, या शिक्षकांच्या निलंबनाच्या कारवाई आदेशावर सोमवारी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांनी सही केली. या प्रकरणात आरोपी असलेला अनिल कळणे हा कंत्राटी शिक्षक असल्याने त्याला निलंबित करण्याऐवजी त्याच्या बडतर्फीचाच निर्णय होणार असून, या प्रकरणी म्हणणे मांडण्यास त्याला ४८ तासांची मुदत देण्यात आली. उर्वरित आरोपीपैकी शिक्षक शशिकांत आणेराव, कुबेर खांडेकर, विठ्ठल रत्नपारखी, एस. आर. मुद्दे, आर. एफ. राठोड यांना निलंबित करण्यात आले,यातील राठोड फरारी आहे.

Story img Loader