कल्याण डोंबिवली महापालिकेतील निलंबित कार्यकारी अभियंता व साहाय्यक संचालक नगररचना सुनील जोशी यांना महापालिका प्रशासनाने पुन्हा सेवेत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिका सेवेत घेण्यासाठी जोशी यांनी एक विनंती अर्ज प्रशासनाला सादर केला असल्याचे पालिकेतील सूत्रांकडून सांगण्यात येते.
फेब्रुवारी २०१० रोजी आधारवाडी येथील कल्याण स्पोर्ट्स क्लबचे ठेकेदार डॉ. दिलीप गुढका यांच्याकडून गाडीचा चालक गुप्ता याच्यातर्फे पाच लाखांची लाच घेताना जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून जोशी महापालिका सेवेतून निलंबित आहेत. पालिकेतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने शासनातील सचिव पदावरील अधिकाऱ्यांकडे जोशी यांच्या सेवेची महापालिकेला आता गरज आहे, असे मत व्यक्त केले असल्याचे सांगण्यात येते. पालिकेतील सध्याचा ढिसाळ कारभार, रखडलेले प्रकल्प पाहाता जोशी यांना सेवेत घेण्यासाठी काही लोकप्रतिनिधी सक्रिय झाले आहेत.
‘आपणावर लाच घेतल्याचे झालेले आरोप, दाखल केलेला गुन्हा चुकीचा आहे. आपणास अकार्यकारी पदावर नियुक्ती देण्यात यावी’ अशी मागणी जोशी यांनी पालिका प्रशासनाकडे केली असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. लाच घेताना पकडलेले सुरेश पवार यांना ज्या शासकीय अध्यादेशाचा आधार घेऊन पालिका सेवेत घेण्यात आले. त्याच पद्धतीने जोशी यांचा परतीचा मार्ग असेल. आता त्यात अडथळा येण्याची शक्यता कमी असल्याचे विश्वसनीय पालिका सूत्राने सांगितले.