छत्रपती शिवाजी शासकीय सर्वोपचार रुग्णालयात रुग्णावरील उपचाराच्या कारणावरून तेथील एका निवासी डॉक्टराला बेदम मारहाण केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर व त्यांच्या दोघा सहकाऱ्यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. तथापि, त्यांच्या विरोधात डॉक्टर संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल व्हावा म्हणून निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने हाती घेतलेले राज्यव्यापी कामबंद आंदोलन मागे घेतले न जाता सुरूच राहणार आहे.
शासकीय रुग्णालयात बी ब्लॉक इमारतीत प्रसूतीसाठी पहाटे आलेल्या एका महिलेवर उपचार होण्यासाठी मदत करण्यास नकार दिल्याने तेथील निवासी डॉक्टर प्रशांत पाटील यांना फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर व त्यांच्या दोघा सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. हे मारहाणीचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंदिस्त झाले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने लगेचच सामूहिक रजा आंदोलन करून कामावर बहिष्कार घातला. नंतर काल बुधवारपासून हे कामबंद आंदोलन राज्यभर सुरू झाले. तर इकडे, सोलापुरात निवासी डॉक्टरांच्या असंवेदनशीलच्या विरोधात व पोलीस अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ मनसेसह नागरिकांच्या विविध संघटनांनी प्रतिआंदोलन केले होते.
दरम्यान, आंदोलनाची तीव्रता वाढल्याने अखेर पोलीस महासंचालकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक नितीन चौगुले व हवालदार सुरवसे या तिघांना निवासी डॉक्टरास मारहाण केल्याप्रकणी निलंबित केले. रुग्णालयातील असंवेदनशील रुग्णसेवेमुळे सामान्यांना या मारहाणप्रकरणात निवासी डॉक्टरच्या बाजूने सहानुभूती दिसून येत नाही. तर पोलिसांच्या निलंबनाच्या कारवाईबद्दल नागरिक व रुग्णांचे नातेवाइकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
या प्रकरणी राज्यभर मार्डने कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे तिघा पोलिसांना निलंबित केले असले तरी जोपर्यंत या पोलिसांना डॉक्टर संरक्षण कायद्यान्वये कारवाई होत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मार्डच्या सोलापूर शाखेचे सरचिटणीस डॉ. जितेंद्र रामटेके यांनी स्पष्ट केले. निवासी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनाचा फटका सामान्य गरीब रुग्णांना बसत आहे. रुग्णालयात होणाऱ्या नियमित शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत असल्याचे दिसून आले.
निवासी डॉक्टरला मारहाण करणारे पोलीस निरीक्षकासह तिघे निलंबित
छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात रुग्णावरील उपचाराच्या कारणावरून तेथील एका निवासी डॉक्टराला बेदम मारहाण केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर व त्यांच्या दोघा सहकाऱ्यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.
आणखी वाचा
First published on: 03-01-2014 at 03:07 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspended police inspector with three for beaten resident doctor