विक्रमगड तालुक्यातील दादडे येथील अरविंद स्मृती संचालित अनुदानित अरविंद आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या अक्षता कवटे या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा मृत्यू आजारपणाने झालेला नसून मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाल्याची तक्रार आदिवासी एकता परिषदेने केला आहे. या प्रकरणी संबंधितावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी परिषदेमार्फत करण्यात आली आहे. अक्षताचा मृतदेह ताब्यात घेताना मृतदेहावर संशयास्पद खुणा आढळून आल्याने ही हत्या असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या मृत्यूचे गूढ वाढले आहे. विक्रमगड पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. २२ नोव्हेंबर रोजी अक्षताने वडिलांकडे भ्रमणध्वनीवर फोन करून खर्चासाठी पैसे मागितले होते. त्या वेळी आजारपणाबद्दल काहीच सांगितले नव्हते, असे तिचे वडील रवी कवटे यांनी सांगितले. मात्र शनिवारी अक्षताला विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि रविवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. हे संशयास्पद असल्याचे एकता परिषदेचे श्यामसुंदर यांनी सांगितले.

Story img Loader