शासन व साखर कारखानदारांकडून ऊसदर जाहीर होण्यातील विलंबाने ऊस उत्पादक संतप्त होऊ लागला असून, संघर्षांचा भडका उडण्याची भीती अधिक ठळक होऊ लागली आहे. आठ दिवसांपूर्वी म्हणजेच गत शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या गावी कराड येथे आक्रमक आंदोलन छेडून ऊस उत्पादकांची उच्चांकी गर्दी खेचल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निर्णयासाठी २४ नोव्हेंबरपयर्ंत देण्यात आलेली डेडलाईन संपत आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री वा संबंधितांनी ऊसदरासाठी ठोस पावले न उचलल्याने स्वाभिमानीचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सभांपाठोपाठ सभा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या घरच्या मैदानावर तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शेतकऱ्यांची नाराजी शिगेला पोहचवण्याचा खटाटोप केला आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खासदार राजू शेट्टींना भेटीचे निमंत्रण दिल्यासंदर्भात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, राजू शेट्टी यांना मुख्यमंत्र्यांनी आवतन दिल्याचे खरे आहे. पण, आमचे रविवारपासून (दि. २४) कराड येथे होणाऱ्या आंदोलनाची हवा निघावी असा या मागचा डाव आहे. राजू शेट्टी यांनी अडीच हजारापेक्षा जादा ऊसदर देण्यासंदर्भात बोलणार असाल तर येईन अन्यथा आपल्या भेटीस येण्याची आवश्यकता नसल्याचा संदेश मुख्यमंत्र्यांना पाठवला असल्याचे पाटील यांनी सांगितले. आज दिवसभरात सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात अपवाद वगळता साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप झाले नाही. तर, ऊस वाहतूकही पूर्णत: ठप्प असल्याचा दावा त्यांनी केला. आज वाठार येथून निघालेल्या दुचाकी रॅलीने कराडात आगमन करण्यापूर्वी कृष्णा कारखान्यात ऊस वाहतूक व ऊसदरासंदर्भात निवेदन दिले. तर, कराड तहसीलदारांनाही निवेदन देण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा