ऊस दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने परभणी-गंगाखेड रस्त्यावरील तरोडा फाटा येथे शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी १६ आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांची सुटका करण्यात आली.
ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर जाहीर व्हावा, यासाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभर आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनात आता शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना व रघुनाथदादा पाटील यांच्याही संघटनेची साथ मिळत आहे. बुधवारी ऊस आंदोलनकर्त्यांवर झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेची साथ मिळत आहे. गोळीबाराच्या निषेधार्थ शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केले.
जिल्हय़ात सुरुवातीपासून वाढीव ऊसदराच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी परभणी-गंगाखेड रस्त्यावरील तरोडा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहतूक विस्कळीत झाली होती. या वेळी पोलिसांनी १६ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनात गजानन तुरे, केशव आरमळ आदी सहभागी झाले होते. दरम्यान, पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या शेतकऱ्यांना शुक्रवारी दुपारी पाथरी भक्तनिवासमध्ये शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक विजय सीताफळे, कारभारी जोगदंड, शाळिग्राम निकम आदी उपस्थित होते. उद्या (शनिवारी) परभणी-पाथरी रस्त्यावरील पेडगाव फाटा येथे रास्ता रोको करणार असल्याची माहिती माणिक कदम यांनी दिली. पाथरी तहसील प्रशासनास संघटनेने मागण्यांचे निवेदन दिले. दि. २०पर्यंत दर जाहीर करा, अन्यथा कारखान्याचा गळीत हंगाम बंद पाडू, असा इशारा निवेदनाद्वारे कारखाना प्रशासनास देण्यात आला.     

Story img Loader