ऊसदर प्रश्नावर सोलापूर जिल्हय़ात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पेटविण्यास सुरुवात केल्यानंतर माढा तालुक्यात संघटनेचे नेते संजय पाटील-घाटणेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे या भागातील दहशतीच्या प्रकारांना उजाळा मिळाला आहे. साखर सम्राटांच्या चिथावणीमुळेच आपणावर भ्याड हल्ला झाल्याचे घाटणेकर यांचे म्हणणे आहे. याच प्रश्नावर शनिवारी दुपारी कुर्डूवाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांचा मोर्चा काढून दहशत व गुंडगिरीचा निषेध नोंदविण्यात आला. मोच्रेक-यांचा रोख माढय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू संजय शिंदे यांच्या विरोधात होता. शिंदे बंधूंना अटक करण्याची मागणी खोत यांनी केली.
दोन दिवसांपूर्वी कुर्डूवाडी येथे संजय पाटील-घाटणेकर यांच्या कार्यालयावर हल्ला करून घाटणेकर यांना मारहाण करण्यात आली होती. ऊस वाहतूकदार मंडळींनी केलेल्या या हल्ल्याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद नोंदविण्यात आली होती. घाटणेकर यांच्यावरील हल्ल्याच्या सूत्रधारांना अटक करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कुर्डूवाडीत मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत व संजय पाटील-घाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात संजय पाटील-भीमानगरकर, नितीन बागल, दत्तात्रय म्हस्के, सुभाष डुरे-पाटील, महेश चिवटे, शिवाजी पाटील, मारुती नलावडे, सिद्धेश्वर लोकरे आदींचा प्रामुख्याने सहभाग होता. अहल्यादेवी चौकातून निघालेला हा मोर्चा शिवाजी चौकात पोहोचल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले.
या वेळी सदाभाऊ खोत यांनी आमदार बबनराव शिंदे व संजय शिंदे यांच्या अटकेची मागणी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन शेतक-यांच्या हितासाठीच असताना हे आंदोलन गुंडगिरी व दहशतीच्या माध्यमातून रोखण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल, तर त्याचा बीमोड करू, असे त्यांनी ठणकावून सांगितले. तर संजय पाटील-घाटणेकर यांनी माढा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वाढती ताकद खुपत असल्यामुळेच आपणावर भ्याड हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला.
माढा तालुक्यात गतवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन छेडले होते. यंदाच्या वर्षीही हे आंदोलन सुरू झाल्यानंतर संघटनेचे नेते घाटणेकर यांच्यावर हल्ला झाल्यामुळे हा चच्रेचा विषय झाला आहे. यापूर्वी या भागात उपळाई बुद्रुक गावचे उपसरपंच गणेश कुलकर्णी, बारलोणीच्या महात्मा फुले ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष हणमंत आतकर यांच्या झालेल्या हत्या व त्यातून निर्माण झालेले दहशतीचे वातावरण याबद्दलच्या कटू आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे.
दरम्यान, आमदार बबनराव शिंदे यांनी आपल्यावर होत असलेले आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. संजय पाटील-घाटणेकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणाशी आपला काडीमात्र संबंध नाही. त्या दिवशी आपण पुण्यात होतो. ऊस वाहतूकदारांबरोबर चर्चा होत असताना घाटणेकर यांच्याशी वाद होऊन अनुचित प्रकार घडला. आपण दहशतवाद किंवा गुंडगिरीला खतपाणी घालण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असा निर्वाळाही आमदार शिंदे यांनी दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा