ऊसदरवाढ प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याविषयी तुच्छतादर्शक टीका केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातच म्हैसगाव (ता.माढा) येथे हे आंदोलन करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीअंतर्गत अजित पवार यांच्या नव्या फळीची सूत्रे हलविणारे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांच्या खासगी मालकीचा म्हैसगाव येथे विठ्ठल साखर कारखाना चालू आहे. या साखर कारखान्यासमोरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून रोष प्रकट केला. खासदार राजू शेट्टी यांच्याविषयी हिणकस स्वरूपाची टीका करून ऊस दर आंदोलनाबद्दल सामान्यजनांमध्ये बुध्दिभेद करून संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला असला तरी त्यास ऊस उत्पादक शेतकरी बळी पडणार नाहीत, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला आहे. ही प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी शरद पवार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात सात-आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
‘खर्डा-भाकर’ आंदोलन
ऊस दर आंदोलनात यंदा मवाळ भूमिका घेतलेल्या शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खर्डा-भाकर आंदोलन केले. या अभिनव आंदोलनाचे नेतृत्व वसंत आपटे यांनी केले. या आंदोलनात महामूद पटेल, हरिदास थिटे, शिवानंद दरेकर आदींचा सहभाग होता. ऊसदर प्रश्नावर शासनानेच लक्ष घालून दरनिश्चितीचा तोडगा काढावा, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांना आंदोलक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेटून निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवाळीचे गोडधोड खाण्याऐवजी खर्डा-भाकर खाणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते.
दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावबंद आंदोलन केले. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. खासदार राजू शेट्टी यांची कारागृहातून तातडीने सुटका करावी, ऊसदर वाढवून मिळावा आदी मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या या गावबंदच्या वेळी शेतकरी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणाही दिल्या.
काल सोमवारच्या तुलनेत मंगळवारी दुसऱ्या दिवशी ऊस प्रश्नावरील आंदोलन भडकले नव्हते. काल सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्य़ात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करून वाहतूक रोखून धरण्याचा प्रयत्न केला. यात दहा एसटी बसेसचे नुकसान करण्यात आले होते. करमाळा, पंढरपूर, माढा, माळशिरस आदी तालुक्यांमध्ये हिंसक  प्रकार घडले होते.
मोहोळ तालुक्यातील कामती येथे सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसदर प्रश्नावर ऊस वाहतूक रोखली. दोन एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली तर अन्य काही ऊस वाहतूक करणाऱ्या चार चाकी वाहनांच्या चाकांची हवा सोडण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा तालुका पंचायत समितीचे सदस्य प्रभाकर देशमुख यांनी केले. पोलिसांनी आंदोलनात हस्तक्षेप करून २३ शेतकरी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मोहोळच्या शिवाजी चौकातही रास्ता रोको आंदोलन करून सोलापूर-पुणे महामार्गावरील वाहतूक अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा