कांदा निर्यातीला केंद्राने अनुदान द्यावे, डाळिंबाला तेल्या रोगामुळे पॅकेज जाहीर करावे, डाळिंब व टोमॅटो निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात स्थानिक पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्याचे आश्वासन देणाऱ्या केंद्र सरकारने न्याय न दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. कांदा व डाळिंबाच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे.
काँग्रेस आघाडीचे धोरण नरेंद्र मोदी सरकार राबवीत असल्याचा आरोप संघटनेने केला. कांदा व डाळिंब उत्पादकाने नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊन आपली काही पिके वाचवली. गारपिटीत कांदा व डाळिंबाचे मोठे नुकसान झाले. सध्या कांदा व डाळिंबाला मिळणाऱ्या भावाचा विचार केल्यास उत्पादन खर्च भरून निघणे अवघड झाले आहे. त्यात केंद्र सरकारने परदेशातून कांद्याची आयात करून स्थानिक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार खोत यांनी केली. या घडामोडींमुळे कांद्याचे पीक घ्यावे की नाही, याचा विचार शेतकरी करीत आहे.
केंद्र सरकारने कांदा व बटाटय़ाला जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट केले. पण त्यांची आधारभूत किंमत मात्र जाहीर केली नाही. नियम धाब्यावर बसवून तीन हजार रुपये क्विंटल दराने कांदा आयात केला. देशातील शेतकऱ्याला पाच रुपये किलो भाव, तर परदेशातील शेतकऱ्याला ३० रुपये किलोचा दर देऊन केंद्र सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याची तक्रार या वेळी करण्यात आली.
डाळिंबावर तेल्या रोगाचे संकट आले. केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे निर्यातीचे प्रमाण कमी झाले आहे. निर्यातीला चालना देण्यासाठी तसेच उत्पादकांना तेल्या रोगासाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी संघटनेने केली. कांदा निर्यातमुक्त करावा, कांदा-बटाटय़ाला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळावे, किमान निर्यात मूल्य शून्य करावे, स्वामिनाथन आयोगाच्या निर्देशानुसार कांद्याची आधारभूत किंमत जाहीर करावी, डाळिंबाला तेल्या रोगाचे पॅकेज जाहीर करताना आणेवारीची अट टाकू नये, डाळिंबाची निर्यात वाढविण्यासाठी अनुदान द्यावे, टोमॅटो निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी खोत यांच्यासह संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, हंसराज वडघुले आदींनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली. या मागण्या मान्य न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही खोत यांनी दिला आहे.

Story img Loader