गतवर्षीच्या उसाला २ हजार २५० रुपये भावाच्या तुलनेत केवळ १ हजार ८०० रुपये पहिली उचल जाहीर करून जिल्हय़ातील साखर कारखाने शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहेत, असा आरोप करून त्याच्या निषेधार्थ, तसेच ऊस उत्पादकांना किमान २ हजार ३०० रुपये पहिली उचल द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर रुमणे मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सुमारे २ हजार शेतकरी हातात रुमणे व ऊस घेऊन सहभागी झाले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे, विधी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. विजय जाधव, मराठवाडा अध्यक्ष सत्तार पटेल, मनसे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली टाऊन हॉल येथून मोर्चा काढण्यात आला. जिल्हय़ातील कारखान्यांनी तत्काळ २ हजार ३०० रुपये पहिली उचल द्यावी, अन्यथा मनसेतर्फे आंदोलनात उडी घेऊन येत्या १५ जानेवारीपासून जिल्हय़ातील सर्व कारखाने बंद पाडले जातील, असा इशारा देण्यात आला.
मागील वर्षी मनसे व शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे मराठवाडय़ात सर्वाधिक २ हजार २५० रुपये पहिली उचल दिली होती. पश्चिम महाराष्ट्रात २ हजार ५०० रुपये पहिली उचल देण्यात आली होती. या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात २ हजार ६५० रुपयांची पहिली उचल देण्यात आली. याउलट लातूर जिल्हय़ात गेल्या वर्षीपेक्षा ४५० रुपये कमी करून १ हजार ८०० रुपये पहिली उचल कारखान्याने जाहीर केली, हे अत्यंत क्लेशकारक आहे. या वर्षी ऊस खरेदी करमाफी ६ हजार ६०० रुपये कोटींचे पॅकेज या दोन महत्त्वपूर्ण मदतीची घोषणा सरकारने केली. केवळ साखरेच्या अस्थिर भावाचे कारण पुढे करून शेतकऱ्यांना प्रतिटन ४५० टन कमी देणे उचित नाही. शेतमजूर, खत, बेणे आदी विषयात महागाई वाढल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे, असेही सांगण्यात आले.
भास्कर औताडे, सुरेंद्र आकनगिरे, अॅड. विजय जाधव, अरुणा कुलकर्णी, राजकुमार होळीकर, गीता गौड, गणेश गवारे, गणेश माडजे, नारायण नरखेडकर, सचिन ढवण, बबन चव्हाण, अशोक दहीफळे, गणेश वांगे, काशीनाथ भोसले आदींसह शेतकरी मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा