ऊसदराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णी येथे ‘चक्का जाम’ आंदोलन करून रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात सुमारे शंभर शेतकरी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
जिल्हय़ात ऊसदर प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, त्या तुलनेत अन्य शेतकरी संघटना ‘थंड’ आहेत. विशेषत: शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे अस्तित्व कोठेच दिसत नसल्याचे जाणवते. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रबळ बनत चालल्याचे दिसून येते.सकाळी टेंभुर्णी येथे संघटनेचे प्रदेश सरचिटणीस संजय पाटील-घाटणेकर व शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या काही शेतकऱ्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांनी वेळीच दक्षता घेऊन आंदोलकांना ताब्यात घेतले.
दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस प्रश्नावर ‘गाव बंद’ची हाक दिली. या आंदोलनास गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे ‘गाव बंद’ आंदोलन यशस्वी झाले. शिवाजी सोळसे, सावता राक्षे, शहाजी कवडे, संतोष यलमार आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
करमाळय़ात ‘रास्ता रोको’
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदुभाऊ खोत यांनी पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ करमाळा तालुक्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.  आदिनाथ सहकारी साखर कारखान्याजवळ शेळगाव भाळवणी येथे संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली ‘रास्ता रोको’ करून रस्त्यावर वाहतूक बराच वेळ रोखून धरली होती. ऊस प्रश्नावर आंदोलनाचा जोर प्रामुख्याने करमाळा, माढा, पंढरपूर, माळशिरस भागांत जोर दिसून येतो.    

Story img Loader