सोयाबीनला प्रती क्विंटल ५ हजार रुपये, कापसाला ८ हजार रुपये आणि मूग, उडीद कडधान्यांना किमान ६ हजार रुपये भाव मिळावा, अशा आग्रही मागणीसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी बुलढाणा व चिखली येथे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली, तर खामगाव येथे तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी आघाडी शासनाचा जोरदार निषेध करण्यात आला.
गेल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या विशाल मोर्चात संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेटृी यांनी जिल्ह्य़ातील प्रत्येक आमदारांच्या घरापुढे सोयाबीन-कापसाला भाव मिळण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. इतर दिवशी आमदार विधानसभा अधिवेशनात व्यस्त असतात. ते केवळ रविवार व सुट्टीच्या दिवशीच घरी असल्यामुळे रविवार ठिय्या आंदोलनासाठी निवडण्यात आला. सत्ताधाऱ्यांच्या घरापुढे आंदोलन करण्याची घोषणा तुपकरांनी केली होती. त्यानुसार सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे निवासस्थानी बुलढाण्यात चिखली मार्गावर आहे. विशेष म्हणजे, तुपकर यांच्या निवासस्थानासमोरील रस्ता ओलांडला की, शिंगणे यांचे निवासस्थान आहे. आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह तुपकर यांनी सकाळी आमदार डॉ. शिंगणे यांच्या घरापुढे आंदोलन केले. देऊळगावमही परिसरात नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे डॉ. शिंगणे सकाळीच निघून गेले होते. ते घरी नव्हते. तब्बल २० मिनिटांपर्यंत आंदोलन केल्यानंतर तुपकर यांनी आपले निवेदन डॉ. शिंगणे यांच्या स्वीय सहाय्यकाकडे सोपवून चिखलीकडे कूच केली.
रायपूर येथे कार्यक्रमासाठी गेलेले आमदार राहुल बोंद्रे घरी नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घरापुढे आंदोलन करण्याआधीच अटकाव केला. त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चिखली येथे आमदार बोंद्रे यांच्या जयस्तंभ चौक, आंबेडकर पुतळ्याजवळील जनसंपर्क कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. बुलढाण्यापेक्षा चिखली येथे बराच वेळपर्यंत आंदोलन सुरू राहिले. या ठिकाणी तुपकर यांचे भाषणही झाले. त्यात त्यांनी आमदार बोंद्रे यांच्यावर टीका केली. शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी घरी थांबायचे सोडून बाहेर पळणाऱ्या आमदारांची भेट शेतकरीही घेणार नाहीत, असा इशारा तुपकर यांनी दिला.
खामगाव येथे आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी स्वत: आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दोन्ही पक्षांमध्ये विस्तृत चर्चा झाली. बुलढाणा आणि चिखली येथील आंदोलनात बबनराव चेके, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, अजयसिंग सोळंकी, अनिल वाकोडे, राणा संजय इंगळे, भगवानराव मोरे, सरदारसिंग इंगळे, शंकरराव तायडे, राणा चंदन, संतोष राजपूत, कैलास जाधव, शेख रफिक, सतीश अण्णा उबाळे, ज्ञानेश्वर जाधव, अविनाश डुकरे आदी सामील झाले होते.
बुलढाणा जिल्ह्य़ात सत्ताधाऱ्यांच्या घरांपुढे स्वाभिमानीचे आंदोलन
सोयाबीनला प्रती क्विंटल ५ हजार रुपये, कापसाला ८ हजार रुपये आणि मूग, उडीद कडधान्यांना किमान ६ हजार रुपये भाव मिळावा, अशा आग्रही मागणीसोबत
First published on: 17-12-2013 at 07:47 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swabhimanis rally in front of power holders house