महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने स्वच्छतेबाबत मोठी जनजागृती सरकारी पातळीवरून करण्यात आली. विशेषत: रेल्वे स्थानकांवर त्याचे परिणाम तात्काळ जाणवू लागले. फलाटांच्या स्वच्छतेसाठी सफाई कामगारांची नेमणूक करण्यात आली. अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी संघटनांना या स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यामुळे रेल्वे स्थानकांना लवकरच स्वच्छतेची झळाळी मिळेल ही अपेक्षा मात्र रेल्वे प्रशासनाच्या कामचुकारपणामुळे फोल ठरली आहे. फलाट स्वच्छ झाले असले तरी त्यावरील कचरा चक्क स्थानकाच्या छपरांवरच टाकण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या मोहिमेला रेल्वे प्रशासनाच्या वतीनेच हरताळ फासल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणेबरोबरच प्रत्येक रेल्वे स्थानकांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. प्रत्येक स्थानकात रेल्वे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी आणि सामाजिक संस्थांनी स्वच्छतेसाठी या मोहिमेत सहभाग नोंदवला. फलाट स्वच्छ झाले. भिंतीवरील थुंकीच्या पिचकाऱ्या पुसण्यात आल्या तर कायमस्वरूपी स्वच्छतेसाठी ठाणे स्थानकात खाजगी कंपनी नेमण्यात आली. त्यामुळे महिनाभरात ठाणे स्थानकाचे चित्र पालटून स्वच्छ स्थानक होईल, अशी अपेक्षा होती. मात्र महिनाभरानंतर फलाटांची स्वच्छता होत असल्याचे दिसत असले तरी हा कचरा चक्क फलाटांच्या छप्परांवर टाकला जात असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. त्यामुळे अवघ्या महिनाभरामध्ये ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर कचऱ्याचा ढीग साचू लागला आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनला लागून सॅटीस असल्याने तिथून हा कचरा टाकल्याचे प्रथमदर्शनी दिसते. सॅटीस प्रकल्पाचे स्वच्छता कर्मचारी या बाजूने कचरा टाकत असल्याचा रेल्वे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. याबाबत सॅटीस आणि रेल्वे स्थानक स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रेल्वे पूल आणि रेल्वे स्थानकाचे छप्पर यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा नसल्याने पुलांवरून छपरांवर प्रवेश करणे नेहमीच सोपे असते. त्यामुळे भिकारी, गर्दुल्ले यांचा रेल्वे स्थानकाच्या छपरांवर नेहमीच वावर राहिला आहे. या आगंतुकांना रोखण्यात रेल्वे प्रशासन आणि पोलीस अपयशी ठरत असताना छपराच्या जागेचा उपयोग आता रेल्वे प्रशासनाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी चक्क कचरा कुंडीसारखा करून घेतल्याने दिसून येत आहे.