गेल्या तीन-चार महिन्यांपासून नागपूर शहर व ग्रामीणमध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे. आरोग्य विभाग डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करत असला तरी, अद्याप त्याला पाहिजे तसे यश मिळत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये डेंग्यूची अजूनही दहशत आहे. एका बाजूने राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेचा झाडू फिरवला जात असताना शहरात मात्र अजूनही जागोजागी कचऱ्यांचे ढिग दिसत आहे. दिवसेंदिवस डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयेही ‘हाऊसफुल्ल’ असल्याचे दिसतात. काही नागरिकांनी डेंग्यूवर आळा घालण्यासाठी महापालिकेने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे, यावरून ‘डेंग्यू’ने किती दहशत निर्माण केली, हेच अधोरेखित होत आहे.
जानेवारी ते ऑक्टोबपर्यंत नागपूर शहरात ४, तर ग्रामीणमध्ये ९ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकृत आकडेवारीवरून दिसत, परंतु याहूनही ही संख्या अधिक असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शहरात आतापर्यंत २५८ नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यूने थैमान घातल्यानंतर जाग आलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने घरोघरी तपासणी मोहीम राबवली. त्यात ११ हजार ४८५ घरात, तर शहरातील एकूण २६० शाळांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २० शाळांमध्ये डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्या आहेत. डेंग्यूचे डास दिवसा चावतात आणि याचवेळी विद्यार्थी शाळेत राहतात. डेंग्यूमुळे शहरात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सध्या महापालिकेचा आरोग्य विभाग उद्रेक झालेल्या भागात धूर फवारणी करत आहे. ‘एडिस इजिप्ती’ हा डास चावल्यानंतर पाच-सहा दिवसाने डेंग्यूची लागण होते. डेंग्यूमध्ये दोन प्रकारचा ताप येतो. रक्तस्राव होणारा ताप अधिक धोकादायक असतो. त्यामुळे मृत्यू ओढवतो.
लहान मुलांमध्ये मुख्यत: सौम्य स्वरूपाचा ताप येतो. प्रौढ व्यक्तींमध्ये अधिक तीव्रतेचा ताप येतो. तीव्र तापासोबत डोळे व डोके दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येणे, चव आणि भूक नष्ट होणे, मळमळणे आणि उलटय़ा होणे ही लक्षणे दिसून येतात. एडिस इजिप्ती या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. यात सिमेंटचे टाके, रांजणामधील पाणी, प्लास्टिकच्या बादल्या, रिकाम्या बादल्या, नारळाच्या करवंटय़ा, घरातील शोभेच्या कुंडय़ा, निरुपयोगी टायर्स, कुलर, घरातील स्वयंपाकाचे भांडे यांचा समावेश आहे.
सध्या डेंग्यूची नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. डेंग्यू झाल्यास शासकीय रुग्णालयात योग्य उपचार होत नसल्याच्या भावनेमुळे रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होतात. तेथे आवश्यक तपासणी व औषधोपचारासाठी दहा हजार ते पंधरा हजार रुपयावर खर्च येतो. तो गरीब व सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचा असल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे, तसेच उपाययोजना करत नसल्याचा आरोप आरोग्य खात्यावर होत आहे. त्यामुळे आरोग्य खात्यातील कर्मचारीही धास्तावलेले दिसून येत आहे.
डेंग्यूबाबत अपप्रचारच होत असल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. यावर्षी नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ात १५५४ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून त्यात २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर गेल्या वर्षी १०९६ रुग्ण आढळून आले होते. त्यात ३५ रुग्णांचा मृत्यू झाला होता
हे उपाय करा : ल्ल ताप आल्यास त्वरित डॉक्टरकडे जाऊन उपचार सुरू करा. ल्ल स्वतहून कोणतेही औषधे घेऊ नका. ल्ल रक्तस्राव आढळून आल्यास रुग्णाला दाखल करणेच योग्य असते. ल्ल संपूर्ण शरीर झाकेल, अशा कपडय़ांचा वापर करावा. ल्ल लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. ल्ल  साठलेले किंवा तुंबलेले पाणी बदलावे. ल्ल  एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. ल्ल घरी डेंग्यू सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.

Story img Loader