लोढा हेवनपासून ते खंबाळपाडा, एमआयडीसी ते देवीचापाडा या डोंबिवली विधानसभा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. डेंग्यूसारखे साथीचे रोग या कचऱ्यामुळे सर्वत्र पसरत असल्याने शहरातील सार्वजनिक स्वच्छतेत सुधारणा करण्यासाठी भाजप डोंबिवलीतर्फे ‘मोदी ब्रिगेड’ स्थापन करण्यात आली आहे. शहर स्वच्छतेसाठी केवळ महापालिकेवर अवलंबून न राहता स्वबळावर ही ब्रिगेड पालिका कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न करील, अशी माहिती भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. यावेळी पूर्व मंडळ अध्यक्ष शशिकांत कांबळे, सुरेश पुराणिक, भास्कर आजगावकर आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश दिला आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी डोंबिवलीतील नागरिकांनी स्वत:हून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन आमदार चव्हाण यांनी केले आहे. भाजपच्या पूर्व आणि पश्चिम मंडल कार्यालयात या स्वच्छता मोहिमेत सहभागी होणाऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यांना मोदी ब्रिगेडचा बिल्ला देण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेतर्फे शहरातील कचरा फक्त एकदा उचलला जातो. डोंबिवलीतील रेल्वे स्थानक भागातील २५ ठिकाणच्या व शहरांतर्गत कचराकुंडय़ा नियमित स्वच्छ राहतील याची या मोहिमेत दखल घेण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पालिकेतर्फे डोंबिवलीतील घनकचऱ्याच्या वाहनांवर १८ वाहन चालक तात्काळ नेमण्यात आले आहेत. पालिकेचे आरोग्य निरीक्षक, सफाई कामगार, वाहन चालक, आरोग्य अधिकारी यांनी स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी कामचुकारपणा करू नये म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याला कामाचे बंधन पत्र तयार करण्याचे सूचित करण्यात आले आहे. भाजपच्या स्वच्छता मोहिमेतील स्वयंसेवक, पालिका कर्मचारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आठवडय़ातून दोन वेळा या स्वच्छता मोहिमेत आपण स्वत: सहभागी होणार आहोत, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
डोंबिवली परिसरातील ज्या ठिकाणचा कचरा उचलला नसेल. त्या ठिकाणची माहिती नागरिकांनी मोहिमेतील स्वयंसेवक, आमदार, उपायुक्त आणि आयुक्तांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून, लघुसंदेशाद्वारे द्यावी. स्वच्छ शहर, सुंदर शहर ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी प्रत्येक डोंबिवलीकराने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आमदारांनी केले आहे.

Story img Loader