स्वागतयात्रेच्या मार्गावर रांगोळ्यांच्या पायघडय़ा, तरुणाईचा उत्साह, आबालवृद्धांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी, ढोल-ताशांच्या तालावर ध्वज नाचविणारे तरुण, दुचाकीवर पारंपरिक वेशातील युवक-युवती, जनजागृतीपर चित्ररथ, बॅण्डपथक, मल्लखांबपट्टूंची पथके, महिलांची दिंडी, लेझीमपथक अशा सुमारे ३० हून अधिक चित्ररथांचा समावेश असलेली भव्य स्वागतयात्रा ठाणे शहरात सोमवारी सकाळी निघाली होती. तरुणाईच्या सहभागामुळे यंदाची यात्रा मोठय़ा जल्लोषात पार पडली. तसेच यंदा निवडणूक वर्ष असल्यामुळे या यात्रेच्या माध्यमातून ‘मतदान करा’, असा संदेश नागरिकांना देण्यात आला.
श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे संस्थेच्या वतीने गेल्या बारा वर्षांपासून ठाण्यात स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात येते. या यात्रेत पारंपरिकता जोपासण्याबरोबरच सामाजिक संस्थांच्या नव्या उपक्रमांची माहिती आणि विविध विषयांवर जनजागृती करण्यात येते. सोमवार पहाटेपासूनच ठाण्यातील विविध भागांतून नववर्ष स्वागतयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी पारंपरिक वेशातील नागरिक तलावपाळी परिसरामध्ये येऊ लागले होते. सकाळी श्री कौपिनेश्वर मंदिरातून पारंपरिक पद्धतीने पालखीचे मोठय़ा उत्साहात प्रस्थान करीत स्वागतयात्रेची सुरुवात झाली. ही पालखी ठाण्यातील सिद्धिविनायक मंदिरातून जांभळी नाका येथून रंगो बापूजी चौक या मार्गाने दगडी शाळेच्या दिशेने निघाली. पालखी तलावपाळीजवळ येताच सर्व रथ या पालखीच्या पाठीमागे येऊ लागले. त्यानंतर पालखीचे शोभायात्रेत रूपांतर झाले. सर्वच वयोगटातील महिला-पुरुषांचा समावेश असलेले ढोलपथक यंदाच्या स्वागतयात्रेचे वैशिष्टय़ होते. तीन ते चार पथकांमध्ये सुमारे तीनशेहून अधिक जणांचा समावेश होता. ठाण्यात पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा संख्यने ढोलपथकांनी आपले प्रतिनिधित्व केल्याचे दिसून आले. त्यामध्ये वीरगर्जना ढोलपथक, अग्निढोलपथक अशा ढोलपथकाने स्वागतयात्रेची रंजकता वाढवली. तसेत विविध ज्ञाती, संप्रदाय, धार्मिक आणि सामाजिक संस्थांचे चित्ररथही मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. पाणी वाचवा, देश भ्रष्टाचार मुक्त करा, इंधनाची बचत करा, दुर्गसंपदा वाचवा, पावसाचे पाणी साठवून पुनर्वापर करा, असे संदेश नागरिकांना चित्ररथातून देण्यात आले. संत ज्ञानेश्वरांचे बालपण एका चित्ररथावर साकारले होते. तर भास्कराचार्याच्या जीवनाचे दर्शन घडविणारा चित्ररथही या स्वागतयात्रेत सहभागी झाला होता. इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स, हिंदूू जनजागृती, विश्व हिंदू परिषद, उपनव आर्ट फेस्टिव्हल, मराठा मंडळ, देवरुखी ब्राह्मण संघ, अशा विविध ज्ञाती संप्रदायांचे चित्ररथ ठाण्याच्या स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. सुमारे ४० ते ५० हजार ठाणेकर या स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. तर सुमारे एक लाखाहून अधिक नागरिकांनी या स्वागतयात्रेचा आनंद अनुभवला.
मतदान करा..
मतदानाविषयी जागृत करणारी पत्रके, बॅच आणि घोषणांच्या मदतीने ठाण्यातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन स्वागतयात्रेच्या माध्यमातून करण्यात आले. मराठा मंडळाचे स्वयंसेवक तसेच विविध चित्ररथांमधून मतदान करण्याचे आवाहन करीत होते. तर स्वागतयात्रेत सहभागी झालेला पारंपरिक वेशातील वासुदेवसुद्धा मतदानाविषयी जागृती करताना दिसून आला.
निवडणूक उमेदवारांची उपस्थिती..
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्वागतयात्रेच्या माध्यमातून आपला प्रचार करण्यासाठी व मतदारांच्या भेटी घेण्याचा फंडा ठाण्यातील स्वागतयात्रेत ठाण्यातील राजकारण्यांनी आजमाविला. स्वागतयात्रेच्या निमित्ताने जमणाऱ्या हजारो मतदारांना भेटण्याची आयती संधी असल्याने ही संधी ठाण्यातील उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी सोडली नाही. स्वागतयात्रेच्या माध्यमातून मतांचा जोगवा मागत आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न राजकीय मंडळींकडून करण्यात आल्याचा या वेळी दिसून आला.  
कल्याण-डोंबिवलीतहीजल्लोष
कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये चैत्र पाडवा नववर्षांनिमित्त स्वागतयात्रा काढण्यात आल्या. नेहमीप्रमाणे नागरिक उत्साहाने स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. डोंबिवली शहरातील महानववर्ष स्वागतयात्रेसह कल्याण (पूर्व) आणि कल्याण (पश्चिम) अशा तीन स्वागतयात्रा या भागातून निघाल्या होत्या. कल्याणमध्ये ६० तर डोंबिवली १०० चित्ररथ स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. या रथांच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश नागरिकांना देण्यात आले.
कल्याणमध्ये सिंडिकेट येथून स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. शंकराचार्य स्वामी महादेव गिरी महाराज, स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी यात्रेचे सारथ्य केले. ढोल-ताशांच्या गजरात, उत्साहाने नागरिक यात्रेत सहभागी झाले होते. वेद प्रतिष्ठानने शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी आश्वासक गुढी उभारली होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे मतदानासाठी आवाहन करणारा रथ यात्रेत सहभागी केला होता. मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके नागरिकांना भुरळ घालत होती. सकाळपासून कल्याण शहर नववर्षांच्या स्वागतासाठी दुमदुमून गेले होते. नमस्कार मंडळात यात्रेचा समारोप झाला. ‘नवीन सवंताला प्रारंभ झाल्याने त्याचे स्वागत आपण गुढी उभारून करतो. धर्मनिष्ठेची ही गुढी निष्ठेने जगा, असा एक संदेश देते. प्रत्येकाला बहुरंगी जीवन जगता यावे यासाठी गुढीमध्ये अनेक रंग असतात. हाच आनंद घेऊन प्रत्येकाने आनंदाने जगावे,’ असा उपदेश शंकराचार्यानी केला.
डोंबिवलीत भागशाळा मैदान येथून सकाळी स्वागतयात्रेला गणेशपूजन करून प्रारंभ झाला. डॉ. तात्याराव लहाने, स्वामी महामंडलेश्वर या वेळी उपस्थित होते. ढोल, ध्वजपथके, विविध संदेश देणारे चित्ररथ, विविध धार्मिक संस्थांची भजने, टाळ-मृदुंगांचा गजर, बालगोपाळ, महिला-पुरुषांची लक्षणीय उपस्थितीने स्वागतयात्रा बहुरंगी झाली होती. प्रत्येक चौकात यात्रेचे फूल-पाकळ्यांनी स्वागत केले जात होते. निवडणूक प्रचाराचा काळ असल्याने सर्वपक्षीय उमेदवारांनी यात्रेत हजेरी लावली. नववर्षांनिमित्त गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासून रांगा लागल्या होत्या.
अंबरनाथ : अंबरनाथ (पूर्वे)कडे स्वामी समर्थ चौक येथून सकाळी ८ वाजता नववर्ष स्वागतयात्रा निघाली होती. स्वामी समर्थ चौक ते हेरंब मंदिर मार्गे, शिवाजी चौक आणि हुतात्मा चौकामध्ये शोभायात्रेची सांगता करण्यात आली होती. सामाजिक, धार्मिक आणि सांप्रदायिक संस्थांच्या पथकांनी या स्वागतयात्रेत मोठय़ा संख्येने सहभाग घेतला होता.  
दीपोत्सवाने उजळला खारेगाव तलाव
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला खारेगाव परिसरात स्वागतयात्रा आणि दीपोत्सवाने नववर्षांचे स्वागत करण्यात आले. श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या सहकार्याने या भागात गेल्या आठ वर्षांपासून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून यंदा खारेगाव तलाव परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. पर्यावरण दक्षता मंच संस्थेच्या वतीने आकाशामध्ये पर्यावरण स्नेही कंदील सोडण्यात आले. त्यामुळे हा परिसर कंदिलांच्या प्रकाशात उजळून निघाला. खारेगाव येथील प्रेमनगर मित्र मंडळ, उदय मित्र मंडळ, राजपार्क सोसायटी अशा या भागातील विविध संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
रांगोळीच्या पायघडय़ा..
नववर्षांच्या स्वागतासाठी रांगोळीच्या पायघडय़ा आंथरण्याचा उपक्रमसुद्धा विविध ठिकाणी हाती घेण्यात आला होता. त्यामध्ये श्रीराम व्यायामशाळा मैदानावर संस्कार भारतीच्या वतीने बारा ज्योतिर्लिगांचे दर्शन घडवणारी रांगोळी साकारण्यात आली होती. गावदेवी मैदान येथे रंगरसिक-रंगवल्ली परिवार आणि विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने १६ हजार चौरस फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.